भोपाळ: अनेकदा पती-पत्नीत मद्य सेवनावरुन भांडणं होतात. काही वेळा अशी प्रकरणं न्यायालयातही जातात. पतीच्या मद्यसेवनाला कंटाळलेल्या महिला कौटुंबिक न्यायालयात धाव घेतात. मात्र भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची चर्चा आहे. पत्नीनं मद्य सेवन करावं यासाठी पतीनं कौटुंबिक न्यायालय गाठलं आहे. पत्नीनं किमान कौटुंबिक कार्यक्रमात मद्य सेवन करावं, अशी पतीची इच्छा आहे. न्यायालयात आलेलं हे प्रकरण खूप वेगळं असल्याचं समुपदेशक शैल अवस्थी यांनी सांगितलं. मी आतापर्यंत कधीच असं प्रकरण पाहिलेलं नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले. 'संबंधित कुटुंब मध्यमवर्गीय आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती साधारण आहे. पती खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याचे आई, वडील, भाऊ, बहिण असे सगळेच मद्य सेवन करतात. त्याचे इतरही नातेवाईक कौटुंबिक कार्यक्रमात मद्य सेवन करतात. मात्र त्याची पत्नी मद्य सेवन करत नाही,' असं अवस्थी यांनी सांगितलं. लग्नानंतरचे काही दिवस या दाम्पत्यात वाद नव्हता. मात्र त्यानंतर सासरच्या व्यक्तींनी महिलेवर मद्य सेवन करण्यासाठी दबाव वाढवण्यास सुरुवात केली. आम्हाला कंपनी दे, यासाठी सक्ती केली जाऊ लागली. त्यानंतर वाद सुरू झाला. या दाम्पत्याला 9, 6 आणि 4 वर्षांची अपत्यं आहेत. सुरुवातीला त्यांच्यात यावरुन लहानमोठ्या कुरबुरी व्हायच्या. मात्र त्यानंतर याचं रुपांतर भांडणांमध्ये होऊ लागलं. त्यामुळे त्यांनी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. सध्या हे दाम्पत्य समुपदेशकाची मदत घेत आहे.
अजब! पत्नीनं मद्य सेवन करावं म्हणून त्यानं घेतली कोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 1:28 PM