पत्नी पतीला छळत असल्याचे अनेक रिल्स, व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत असतात. रिल्सवाली अनेक जोडपी तर याच विषयाचे व्हिडीओ टाकून फेमसही होत आहेत. अशातच एका पतीला एकाच दिवसात त्याच्या पत्नीला १०० वेळा कॉल करण्याचा प्रकार भारी पडला आहे. पोलिसांनी या पतीला अटक केली आहे. पती तिला का कॉल करायचा याचे कारण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. आता पत्नी तक्रार मागे घेते की पोलीस दया दाखवितात यावर या पतीची तुरुंगातून सुटका होणार आहे.
आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पत्नीवर किती प्रेम आहे ते दाखविण्याची ही त्याची पद्धत होती. जपानमध्ये हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी ३८ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. चौकशीत त्याने मी पत्नीवर खूप प्रेम करतो आणि तिला फोन करून त्यावर काहीच बोलत नाही, असे त्याने सांगितले.
ह्योगो प्रांताच्या पोलिसांनी हे कारण ऐकले तेव्हा त्यांना विश्वास बसत नव्हता. ३१ वर्षांच्या महिलेला १० जुलैपासून अज्ञात नंबरवरून फोन येऊ लागले होते. कॉलवर समोरून कोणी बोलतच नव्हता. वैतागून ही महिला फोन कट करत होती. अनेक दिवस हा प्रकार सुरु राहिल्याने महिलेने अखेर पोलिसांकडे तक्रार केली. वेगवेगळे नंबर असल्याने ती कॉल ब्लॉक करूनही दमली होती.
सुरुवातीला १०-१२ वेळा येणारा फोन नंतर दिवसाला १०० कॉल एवढा वाढत गेला. जेव्हा पत्नी पतीच्या मोबाईलवर व्हिडीओ गेम खेळायची तेव्हा तिला कधीच फोन येत नव्हता. यामुळे तिला थोडा पतीवर संशय आला होता. पती बेडरुममध्ये सोबत असल्यावरही तिला क़ॉल येत नव्हते. महिलेने पोलिसांना थेट तिला तिच्या पतीवरच संशय असल्याचे सांगितले. अँटी स्टॉकर कायद्यानुसार पतीला पोलिसांनी अटक केली. तपासात ते कॉ़ल पतीच करत होता हे पोलिसांना समजले होते.