बरेली: उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये कार खरेदीवरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. प्रकरण एसएसपी कार्यालयापर्यंत पोहोचलं. पतीनं सेकंड हँड कार खरेदी केल्यानं पत्नी नाराज होऊन माहेरी निघून गेली. जोपर्यंत नवी कार घेणार नाही, तोपर्यंत घरी परतणार नाही, असं म्हणत पत्नी हट्टाला पेटली आहे. माहेरी गेलेली पत्नी येत नसल्यानं पतीनं पोलिसांकडे धाव घेतली.
बरेलीच्या इज्जतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. पत्नी बऱ्याच दिवसांपासून कार खरेदी करा म्हणून मागे लागली होती. तिचा हट्ट पुरवण्यासाठी पतीनं सेकंड हँड कार खरेदी करण्याची तयारी दर्शवली. ते ऐकून पत्नी संतापली. जोपर्यंत नवी कार घेत नाही, तोपर्यंत माहेरीच राहणार असल्याची भूमिका तिनं घेतली, अशी तक्रार पीडित संजीव शर्मांनी एसएसपी कार्यालयात केली. माझी आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे कार खरेदी करू शकत नसल्याचं म्हणत शर्मांनी त्यांची व्यथा पोलिसांकडे मांडली. पत्नीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पैसे आल्यावर नवी कार खरेदी करू. तोपर्यंत सेकंड हँड खरेदी करू, असं त्यानं पत्नीला सांगितलं. मात्र तरीही पत्नी ऐकली नाही. ती मुलांना घेऊन माहेरी निघून गेली.
संजीव शर्मांचा विवाह २००७ मध्ये झाला. त्यांना दोन मुलं आहेत. पत्नी लहानसहान गोष्टींवर संशय घेत असल्याचा, वारंवार अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्नी अनेकदा मला न विचारताच माहेरी जाते. पत्नी आणि तिच्या माहेरचे लोक माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी करतात. त्यामुळे पोलीस मला त्रास देतात, अशा शब्दांत शर्मांनी व्यथा मांडली.