गांधीनगर- गुजरातच्या वडोदरामधील सरदार सरोवर निगममध्ये काम करणारा एका इंजीनिअर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. रमेशचंद्र फेफरे असं या इंजीनिअरचं नाव असून आपण विष्णूचा दहावा अवतार असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आहे. रमेशचंद्र फेफरे गेल्या 8 महिन्यांपासून कामावर गेलेल नाहीत. सततच्या सुट्यांमुळे सरदार सरोवर निगमने त्यांना नोटीस पाठविली. त्या नोटीसला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं आहे. 'मी विष्णूचा दहावा अवतार आहे म्हणून ऑफिसला येऊ शकत नाही', असं उत्तर दांडीबाज रमेशचंद्र फेफरे यांनी ऑफिसमध्ये कळवलं.
'ऑफिसमधील सततच्या कामामुळे त्यांना ध्यान करण्यात अडचण येत असल्याने सुट्टी घेतली आहे', असं ही त्यांनी ऑफिसच्या नोटीसला उत्तर देताना म्हटलं. 'मी राम व कृष्णाचा अवतार आहे. माझी आई अहिल्याबाई आहे तर पत्नी लक्ष्मीचा अवतार असल्याचं', रमेशचंद्र म्हणाले.
'जगाची चिंता आहे आणि पाऊस चांगला पडावा यासाठी ध्यान करण्यात मी तल्लीन आहे. म्हणून मी ऑफिसला येऊ शकत नाही', असं उत्तरही त्यांनी ऑफिसला दिलं. रमेशचंद्र गेल्या 8 महिन्यात फक्त 15 दिवस ऑफिसला गेले आहेत. 'माझ्या साधनेमुळेच गेल्या काही वर्षापासून चांगला पाऊस पडतो आहे, असा दावाही या महाशयांनी केला आहे.