नेहमी कुटुंबात अशी काही रहस्ये दडलेली असतात जी समजल्यानंतर आयुष्य आणि नात्यात सर्वकाही बदलून जाते. इंग्लंडच्या टिफनी गार्डनरला लहानपणापासून माहिती होतं की, तिच्या खऱ्या वडिलांचा कॅन्सरने मृत्यू झाला आहे. त्यानंतर आई आणि सावत्र वडिलांनीच तिचा सांभाळ केला. परंतु टिफनी नेहमी तिच्या खऱ्या वडिलांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहिली. वडिलांचे कोणकोणते गुण माझ्यात आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता टिफनीला लागून राहायची.
जर माझे खरे वडील आज जिवंत असते तर त्यांचे आणि माझे नाते कसे असते असा टिफनी विचार करत राहायची. गेल्या ३ दशकापासून वडिलांचा मृत्यू झालाय हेच तिला माहिती होते. परंतु एकेदिवशी टिफनीच्या आयुष्यात असे काही रहस्य उघड होते ज्याने तिला धक्का बसतो. ज्या वडिलांना मागील ३ दशकांपासून मृत समजत होती ते सगळे खोटे होते. २०१८ मध्ये टिफनीला कळाले की, एका अज्ञात व्यक्तीने डोनेट केलेल्या स्पर्ममधून तिचा जन्म झाला आहे. म्हणजे तिचे वडील जिवंत आहेत. टिफनीला हे कळाल्यावर इतकी वर्ष हे सत्य का लपवून ठेवले गेले या प्रश्नाने तिला हैराण केले.
एक वचन निभवण्यासाठी लपवलं सत्य
टिफनीने द मिररला सांगितले की, माझ्या आईने तिचे पहिले पती आणि माझे मृत वडील यांना वचन दिले होते. मी जैविकदृष्ट्या त्यांची मुलगी नाही हे कुणालाही कळू देऊ नको. १९८२ मध्ये डॉक्टरांनी स्पर्म डोनेशनबद्दल कुणालाही काहीही न सांगण्यास सांगितले होते. माझ्या ३६ व्या वाढदिवसाच्या आधी ही बाब माझ्यासमोर उघडकीस आली. जेव्हा मी आईसोबत किचनमध्ये काम करत होती तेव्हा तिने मला ही गोष्ट सांगितली. मला हे ऐकून धक्का बसला. हे सत्य ऐकून माझे आयुष्यच बदलून गेले. इतकी वर्ष हे माझ्यापासून लपवून ठेवले होते असं ती म्हणाली.