उत्तर प्रदेशातील हापुडेतील तीन फूट उंची असलेल्या इब्राहिमला अखेर त्याची जोडीदार सापडली. महत्वाची बाब म्हणजे इब्राहिमला त्याच्याच उंचीची नवरी मिळाली. इब्राहिमची पत्नी इमरानाची उंची तेवढीच आहे जेवढी इब्राहिमची आहे. शनिवारी दोघांचाही निकाह पार पडला. मेरठच्या कंकरखेडा भागात या अनोख्या लग्नाची चर्चा रंगली आहे. दोघांचाही निकाह मोठ्या जल्लोषात पार पडला.
कंकरखेडा भागात राहणारी इमारानाची उंची ४६ इंच म्हणजे साधारण साडे तीन फूट आहे. इमरानासोबत हापुडे इथे राहणारा इब्राहिम यांच्यासोबत लग्न झालं. इब्राहिमची उंचीही ४६ इंच आहे. इब्राहिमचं वय ३८ वर्षे आहे तर इमरानाचं वय ३६ वर्षे आहे. जन्मापासूनच दोघेही शारीरिक कमतरतेमुळे कमी उंचीचे झाले. इब्राहिम गेल्या काही वर्षापासून लग्नाचं स्वप्न रंगवत होता. पण उंची कमी असल्याने त्याचं लग्न होत नव्हतं किंवा त्याच्या उंचीची मुलगीही त्याला मिळत नव्हती.
इब्राहिम आणि इमरानाची जोडी नियतीने ठरवलेली होती. दोघांचंही वय ३५ पेक्षा जास्त झालेलं होतं आणि दोघांचेही परिवार लग्नासाठी मुलं-मुली पाहून थकले होते. पण ते म्हणतात ना की, वेळेआधी व्यक्तीला काहीच मिळत नाही. त्यामुळे अनेक प्रयत्न करूनही इब्राहिम आणि इमरानाचं लग्न जुळत नव्हतं. दोघांचेही परिवार त्यांच्यासाठी योग्य स्थळ शोधत होते.
इब्राहिमच्या कुटुंबियांनी सांगितलं की, ते नात्याबाबत बोलण्यासाठी हापुडवरून मेरठला पोहोचले होते. इब्राहिम आणि इमरानाने पहिल्या नजरेत एकमेकांना पसंत केलं. इब्राहिम हा लोटगाडीवर फळं विकण्याचं काम करतो. इब्राहिम आणि इमरानाचे कुटुंबिय या लग्नामुळे खूप आनंदी आहेत.