भारतासह आशिया खंडातील बहुतांश देश हे वाढत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहेत. तसेच यापैकी अनेक देशांमध्ये कुटुंब नियोजनावर भर दिला जात आहे. छोटं कुटुंब असणं फायदेशीर असल्याचं सरकारकडून येथील जनतेच्या मनावर ठसवलं जात आहे. त्याचा किंचित फायदा होत आहे. मात्र जगात काही देश असेही आहेत, जिथे अधिकाधिक मुलांना जन्म देण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. त्यापैकीच एक देश आहे तो म्हणजे कझाकिस्तान. मध्य आशियामधील कझाकिस्तान या देशामध्ये दीर्घकाळापासून सोव्हिएट परंपरा सुरू आहे. त्यानुसार ज्यांचं कुटुंब मोठं असतं अशा मातांना पदक देऊन सन्मानित केलं जातं. जगभरात सध्या अनेक देश असे आहेत जिथे नागरिकांनी जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यावा, यासाठी प्रोत्साहित केलं जातं. मात्र कझाकिस्तानने यात बरीच मोठी आघाडी घेतल्याचं दिसतंय.
कझाकिस्तानमध्ये महिलांना अधिक मुलांना जन्म दिल्यावर आणि उच्च जननदरासाठी सरकारकडून पदक देऊन सन्मानित केलं जातं. यामध्ये सात मुलांना जन्म देणाऱ्या मातेला सुवर्णपदक दिलं जातं. तर सहा मुलांना जन्म देणाऱ्या मातेला रौप्य पदक देऊन सन्मानित केलं जातं. तसेच पदक मिळवणाऱ्या महिलेला जन्मभर विशेष भत्ताही दिला जातो. चार किंवा त्यापेक्षा जास्त मुलांना जन्म देणाऱ्या मातांमा पदक मिळत नाही. मात्र त्यांची मुले २१ वर्षांची होईपर्यंत त्यांना आर्थिक मदत दिली जाते.
कझाकिस्तान हा विस्तृत क्षेत्रफळ असलेला पण विरळ लोकसंख्या असलेला देश आहे. येथील लोकसंख्या केवळ २ कोटी ७५ लाख एवढीच आहे. येथील लोकसंख्येची घनता ही प्रति चौकिमी ७ एवढीच आहे. त्यामुळे येथील सरकारकडून लोकसंख्या वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असतात. दरम्यान, या प्रयत्नांमुळे येथील फर्टिलिटी रेट हा ३.३२ पर्यंत पोहोचला आहे.