कोटा - राजस्थानच्या कोटा शहरात झालेल्या एका लग्नाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. एसबीएस हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या एका मुलीसोबत लग्न करण्यासाठी नवरा वऱ्हाड घेऊन पोहचला. नातेवाईकांच्या उपस्थितीत नवरा-नवरीचं लग्न झाले. त्यासाठी हॉस्पिटलमधील एका रुमचं बुकींग करून त्याला सजवण्यात आले होते. याचठिकाणी लग्नसोहळा पार पडला. या नवरीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडी परिसरातील पंकजचं लग्न शनिवारी रावतभाटा येथील मधू राठौरसोबत होणार होते. मागील १ आठवड्यापासून दोघांच्या घरी लग्नाची तयारी सुरू आहे. मात्र त्याचवेळी नवरी मुलगी मधू पायऱ्यांवर खाली पडली. त्या घटनेत नवरीचे दोन्ही हात पॅक्चर झाले. डोक्याला गंभीर दुखापत झाली. तात्काळ कुटुंबातील सदस्यांनी तिला कोटा इथं आणत एसबीएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
नवरी मुलगी पायऱ्यांवर खाली पडल्याचं नवऱ्याकडील मंडळींना समजलं. त्यानंतर पंकजचे वडील शिवलाल आणि मधू यांचे वडील रमेश यांच्याशी चर्चा केली आणि दोघांचे लग्न हॉस्पिटलमध्येच करायचं ठरलं. पंकजचे दाजी राकेश यांनी सांगितले की, नवरी मुलीचा अपघात झाल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी मधू आणि राकेशचं लग्न हॉस्पिटलमध्येच करण्याचं ठरवले. त्यासाठी एक रुम बूक करण्यात आली. ती फुलांनी सजवली. त्याठिकाणी लग्नाच्या विधी पार पडल्या आणि नवरी-नवऱ्याने एकमेकांना हार घातला. हॉस्पिटलमध्येच पंकजनं मधूच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. मधूला चालता येणे शक्य नसल्यानं सात फेरे पार पडले नाहीत. नवरी मुलगी सध्या हॉस्पिटलमध्येच उपचार घेणार असून पुढील काही दिवसांत तिला घरी सोडण्यात येईल.