छिंदवाडा: मध्य प्रदेशातल्या छिंदवाड्यात एक अजब घटना घडली आहे. एका कोंबडीनं जेवण उष्टवल्यानं सुरू झालेल्या वादानं टोक गाठलं. दोन भाऊ आणि त्यांच्या पत्नी यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर भाऊ आणि वहिनीनं विष खाल्लं. त्यांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सीएसपी मोतीलाल कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, छिंदवाडा जिल्ह्यातल्या धरमटेकडी येथील झिरलिंगा गावात राहणाऱ्या विनोद आणि त्याची पत्नी कमला यांनी विष खाल्लं. त्यानंतर त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोठे दीर आणि त्यांच्या पत्नीसोबत आधीपासूनच वाद होता आणि त्यामुळेच घरात दोन्ही बिऱ्हाडं वेगवेगळी राहत होती, असं कमलानं पोलिसांना सांगितलं.
कोंबडीनं जेवण उष्टवल्यावरून दोन जावांमध्ये वाद झाला. लहान जाऊ आणि तिच्या पतीनं याची तक्रार मोठी जाऊ आणि तिच्या पतीकडे केली. त्यावरून दोन दाम्पत्यांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यानंतर विनोद आणि कमला यांनी विष खाल्लं. पोलिसांनी मोठी जाऊ आणि तिच्या पतीविरोधात गुन्हा नोंदवून घटनेचा तपास सुरू केला आहे.