चुरू: राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात एका नवरदेवाला चांगलीच महागात पडली आहे. डीजेच्या तालावर तुफान नाचणाऱ्या नवरदेवाला आणि त्याच्या मित्रांना पाहून वधू संतापली. तिनं संपूर्ण वरातच माघारी पाठवली. यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी वधूचा विवाह दुसऱ्या मुलाशी लावून दिला. लग्न मोडल्यानं नवरदेवानं पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.
चुरू जिल्ह्यातल्या राजगढ तहसीलमधील चेलाना गावात घडलेल्या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. १५ मे रोजी हरयाणाच्या सिवानीतील महावीर जाट वरात घेऊन चेलानात पोहोचले. त्यांचा विवाह चेलानातील मंजूसोबत ठरला होता. वरात मंजूच्या घराजवळ पोहोचताच १५० हून अधिक वराती डीजेच्या तालावर नाचू लागले.
रात्री ९ च्या सुमारास वरात निघाली. डीजेच्या तालावर मद्यधुंद वराती नाचत होते. रात्री १ पर्यंत नाच सुरू होता. डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचणाऱ्या नवरदेवाला आणि त्याच्या मित्रांना पाहून वधू वैतागली. तिचे कुटुंबीयदेखील त्रासले. रात्री २ पर्यंत वरात वधूच्या घरात पोहोचली नव्हती. त्यामुळे लग्नाचे कोणतेही विधी होऊ शकले नाहीत.
डीजेच्या आवाजावर सुरू असलेला नाच थांबावा, अशी विनंती वधूपक्षाकडून करण्यात आली. त्यानंतर नवरदेवाकडच्या मंडळींनी वाद घातला. दरम्यान सप्तपदीचा मुहूर्त टळून गेला होता. यानंतर मुलीकडच्यांनी मुलीचा विवाह दुसऱ्या मुलाशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याच मंडपात मुलीनं दुसऱ्या मुलाशी लग्न केलं.
वराती मंडळी रात्री २ वाजता लग्नघरात पोहोचली. त्यावेळी वधूचा विवाह दुसऱ्या मुलाशी झालेला होता. त्यामुळे नवरदेवाला माघारी परतावं लागलं. यानंतर दुसऱ्या दिवशी मुलाकडच्यांनी मुलीच्या घरी जाऊन जाब विचारला. त्यावर सप्तपदीच्यावेळीच इतका बेजबाबदारपणा असेल, तर भविष्यात तुम्ही नातं कसं निभावणार, असा सवाल वधूकडच्यांनी विचारला.