सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे त्यात राजस्थानमधील एका लग्नाची प्रचंड चर्चा होत आहे. याठिकाणी मुलाच्या मामानं भाच्याच्या लग्ना कोट्यवधी रुपयांची उधळण केली आहे. मामानं लाडक्या भाच्याला लग्नात लाखो रुपयाचा फ्लॅट, सोने-चांदीचे दागिने, १ कार, लाखो रुपयांची रोकड भेट म्हणून दिली आहे.
राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील हे लग्न सोशल मीडियात सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. राजस्थानात यापूर्वीही अनेक लग्न झालेत, ज्यात कोट्यवधी रुपयांची भेट दिली गेली आहे.नागौर जिल्ह्यातील धरनावास गावात राहणाऱ्या रामकेश आणि त्यांची पत्नी मंजू यांचा मुलगा जितेंद्रचं लग्न होते. जितेंद्रचा मामा हनुमान राम सियाग यांनी भाच्याच्या लग्नात १ कोटी ३१ लाख रुपये भेट दिलेत. त्यात २१ लाखांची रोकड, ७५ लाखांचा फ्लॅट, एक लग्झरी कार आणि लाखो रुपयांच्या सोने चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. मामाकडून ही भेट बहिण आणि भाच्याला देण्यात आली आहे.
नवरदेव जितेंद्र हा सध्या स्पर्धा परिक्षांची तयारी करत आहे. त्याचे लग्न नागौर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पूजासोबत झाले. पूजा आणि जितेंद्रचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. सोमवारी या दोघांचे लग्न पार पडले.या लग्नात जितेंद्रच्या मामानं भरभरून भेट दिली. जितेंद्रचे मामा आर्थिक संपन्न आहेत. कुटुंबातील बहुतांश उत्पन्न शेती आणि सैन्य दलातील नोकरीवरचे आहे. जितेंद्रचे मामा वकील आणि शिक्षक आहेत. मामी जोधपूरच्या गावात सरपंच आहे. जितेंद्रच्या आईच्या ३ बहिणी आहेत. तर १ भाऊ आहे. त्या भावाचे नाव हनुमान राम सियाग असून तो जितेंद्रचा मामा आहे.
मागील वर्षी जवळपास ८.५० कोटींची भेट नागौर जिल्ह्यातील एका कुटुंबाने लग्नात दिली होती. हे पाहण्यासाठी आसपासच्या गावातील हजारो लोक जमले होते. लग्नात असा एकही व्यक्ती नव्हता ज्याने भेटवस्तू दिली नाही. ही राजस्थानमधील आतापर्यंत सर्वात मोठं लग्न होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा आणखी एक लग्न चर्चेत आले. ज्यात मामानं भाचाला ७५ लाखांचा जोधपूरमध्ये फ्लॅट, १५ लाखांची कार आणि १५ लाख ज्वेलरी आणि २१ लाखांची रोकड भेट म्हणून दिली आहे.