नागौर - राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील एका लग्नाची सध्या राज्यासह देशभरात चर्चा आहे. याठिकाणी ३ मामांनी मिळून भाचीच्या लग्नात ३ कोटी २१ लाख रुपये खर्च केलेत. त्याचसोबत बहिणीला नोटांनी सजलेली ओढणी भेट म्हणून दिली आहे. नागौरच्या झाडेली गावातील हा प्रकार आहे.
याठिकाणी राहणाऱ्या घेवरा देवी आणि भंवरलाल पोटलिया यांची मुलगी अनुष्काचं बुधवारी लग्न होते. त्यावेळी अनुष्काचे आजोबा भंवरलाल गरवा त्यांची तीन मुले हरेंद्र, रामेश्वर, राजेंद्रसह कोट्यवधीची भेट घेऊन लग्नात पोहचले. आजोबा भंवरलाल यांनी नाती अनुष्काच्या लग्नासाठी ८१ लाख रुपये रोकड, नागौर रिंग रोड येथे ३० लाखांचे घर, १६ एकर जमीन आणि ४१ तोळे सोने, ३ किलो चांदी आणि धान्यांनी भरलेली १ ट्रॅक्टर ट्रॉली आणि एक स्कूटी भेट म्हणून दिली. वडिलांनी आणि भावांनी मिळून दिलेली इतक्या भेटवस्तू पाहून अनुष्काच्या आईच्या डोळ्यात पाणी आले.
राजस्थानात बहिणीच्या मुलांच्या लग्नात माहेरच्या माणसांकडून भेट वस्तू देण्याची प्रथा आहे. सामान्यपणे त्याला भात भरना असं म्हणतात. त्या प्रथेत माहेरच्यांकडून लग्नात कपडे, दागिने, रुपये आणि अन्य सामान दिले जाते. त्यात बहिणीच्या सासरच्यांसाठीही कपडे आणि ज्वेलरी यांचा समावेश असतो. घेवरादेवींचे वडील भंवरलाल यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे ३५० एकर सुपीक जमीन आहे. त्यांना हरेंद्र, रामेश्वर आणि राजेंद्र अशी ३ मुले असून घेवरादेवी एकलुती एक मुलगी आहे. बहिण, मुलगी, सून यापेक्षा जगात कुठलेही मोठे धन नाही असं त्यांनी म्हटलं.
आजोबा नोटांचे बंडल घेऊन लग्नात पोहचलेघेवरादेवीचे वडील स्वत: डोक्यावर नोटांचे बंडल घेऊन लग्नात दाखल झाले. त्यात ८१ लाख रोकड होती. तर मुलीसाठी ५०० रुपयांच्या नोटांनी सजवलेली ओढणी होती. त्याचसोबत १६ एकर शेतजमीन, शहरातील रिंग रोड परिसरात ३० लाखांचा फ्लॅट, ४१ तोळे सोने, ३ किलो चांदीचे दागिने भेट म्हणून दिले. त्याशिवाय धान्याने भरलेला नवीन ट्रॅक्टर आणि स्कूटी दिली. आजोबा-मामांनी दिलेल्या भेटवस्तूंची चर्चा राज्यभरात पसरली. सर्व पंचाच्या समक्ष या भेटवस्तू अनुष्का आणि तिच्या नवऱ्याला सुपूर्द करण्यात आल्या.