मध्य प्रदेशच्या बांधवगड व्याघ्र प्रकल्पात दोन वाघिणींच्या लढाईत मध्ये पडणं बिबट्याला चांगलंच महागात पडलं आहे. जवळपास ७ तास या बिबट्याला झाडावरच काढावे लागले. शुक्रवारी सकाळी वनविभागाला दोन वाघिणींमधील वर्चस्वाच्या लढाईची माहिती मिळाली. ही अत्यंत भीषण लढाई होती. त्यात एका वाघिणीने दुसऱ्या वाघिणीवर बेदम हल्ला केला अशी माहिती व्याघ्र प्रकल्पाचे संचालक बीएस अनेगिरी यांनी दिली.
२ वाघिणींच्या लढाईत मध्ये पडला बिबट्या
जंगलात २ वाघिणींमध्ये घमाशान लढाई सुरू होती. ही लढाई लांबून पाहणाऱ्या बिबट्याने अचानक त्याच हस्तक्षेप केला. त्याने कमकुवत वाघिणीला पळण्यासाठी मदत केली. त्यामुळे दुसरीकडे आक्रमक झालेली वाघिण चिडली. त्यामुळे तिने बिबट्याचा पाठलाग सुरू केला. वन विभागाचे अधिकारी म्हणाले की, बिबट्याने सुरुवातीला पळण्याचा प्रयत्न केला परंतु वाघिण जवळ पोहचणार इतक्याने बिबट्याने जवळील झाडाचा आधार घेत वर चढला. सकाळी ८ वाजता बिबट्या झाडावर चढला होता. मात्र वाघिण त्याच झाडाखाली बसून बिबट्याचा बदला घेण्याचा विचार करत बसली होती.
संतापलेल्या वाघिणीनं बिबट्यावर हल्ला केला
एक तासाने बिबट्या खाली आला, त्याला वाटलं वाघिण झोपलेली आहे. परंतु बिबट्याचा अंदाज चुकीचा ठरला. वाघिणीनं एका फटक्यात बिबट्यावर हल्ला केला. वाघिण दुसरा हल्ला करणार तितक्याने त्याने दुसऱ्या झाडाचा आश्रय घेतला. बिबट्या पळून पुन्हा झाडावर चढला. दिवसभरात तीन वेळा असाच किस्सा बिबट्यासोबत घडला. जेव्हा वाघिणीच्या तावडीतून वाचणं कठीण आहे असं वाटताच बिबट्याने एक पर्याय निवडला. त्याने एका झाडावरुन जुसऱ्या झाडावर उडी मारुन पळण्याचा विचार केला परंतु वाघिणीनं त्याचा पाठलाग सोडला नाही.
तब्बल ७ तास झाडावरच अडकला बिबट्या
दुपारी ३ च्या सुमारात वाघिण तेथून निघून गेली. काही वेळाने बिबट्या झाडाखाली आला आणि सावध पावलाने त्याने धूम ठोकली. दोन वाघिणींच्या लढाईत मध्ये पडलेल्या बिबट्याला अद्दल घडली. आता वनविभाग जखमी वाघिणीचा शोध जंगलात घेत होतं. २ तासांनी वनविभागाला जखमी वाघिण शोधण्यात यश आलं. त्यानंतर या वाघिणीवर प्राथमिक उपचार करुन तिला सोडण्यात आले. बांधवगड व्याघ्र प्रकल्पात कमीत कमी १२४ वाघ आहेत.