Indian Currency : भारतात काही वर्षांपासून नव्या नोटांचं चलन सुरू झालं आहे. या नोटा रंगीत आणि अधिक आकर्षक करण्यात आल्या आहेत. यावर सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळे फीचर्स असतात. या नोटांवर तुम्ही कधी बघितलं असेल की, नोटांच्या एका कोपऱ्यात तिरप्या रेषा असतात. नोटांच्या किंमतीच्या हिशोबाने या रेषांची संख्या वाढत जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की, नोटांवर या रेषा का दिलेल्या असतात?
वेगवेगळ्या नोटांवरील रेषा नोटांबाबत महत्वपूर्ण माहिती देतात. चला जाणून घेऊ १००, २००, ५०० आणि २००० रूपयांच्या नोटांवर असलेल्या या लाईन्सचा अर्थ काय होतो.
काय म्हणतात या रेषांना?
नोटांवर बनलेल्या या रेषांना 'ब्लीड मार्क्स' असं म्हणतात. हे ब्लीड मार्क्स खासकरून नेत्रहीन व्यक्तींसाठी तयार केलेले असतात. नोटांवर असलेल्या रेषांना स्पर्श करून ते सांगू शकतात की, ही नोट किती रूपयांची आहे. याच कारणाने १००, २००, ५०० आणि २००० च्या नोटांवर वेगवेगळ्या संख्येत या रेषा असतात. यावरूनच नेत्रहीन नोटेची किंमत जाणून घेऊ शकतात.
चला एका नोटेच्या किंमतीवर नजर टाकू. १०० च्या नोटेवर दोन्ही बाजूने चार रेषा असतात. ज्यांना स्पर्श केल्यावर नेत्रहीन व्यक्तींना समजतं की, ही १०० रूपयांची नोट आहे. तेच २०० रूपयांच्या नोटेवर दोन्ही कॉर्नरला चार-चार रेषा असतात आणि दोन दोन शून्यही असतात. तेच ५०० च्या नोटेवर ५ आणि २००० च्या नोटेवर दोन्ही बाजूने ७-७ रेषा दिलेल्या आहेत. या रेषांच्या मदतीने नेत्रहीन व्यक्ती सहजपणे नोटांची आणि त्यांच्य किंमतीची ओळख पटवू शकतात.