वेगवेगळ्या कारची आवड असणाऱ्या लोकांना Rolls-Royce कार काय चीज आहे हे चांगलंच माहीत आहे. ही महागडी लक्झरी कार फार जास्त श्रीमंत लोक खरेदी करतात. बॉलिवूडमधील फार कमी लोकांकडे ही कार आहे. तेही त्यांच्याकडे ही एकच कार असेल. पण परदेशातील एका भारतीयाने असा काही कारनामा केलाय की, कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. एका भारतीयाने सहा Rolls-Royce कार एकत्र खरेदी केल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या व्यक्तीकडे आता Rolls-Royce च्या १५ कार झाल्या आहेत.
एकदाच जवळपास ५० कोटी रूपये खर्च करून Rolls-Royce कारचा ताफा खरेदी करणाऱ्या व्यक्तीचं नाव रूबेन सिंह आहे. लक्झरी आणि एसयूव्ही कार्सच्या या ताफ्यात ३ 3 Phantoms आणि 3 Cullinans मॉडलचा समावेश आहे. खास बाब ही आहे की, या कार्स पोहोचवण्यासाठी स्वत: Rolls-Royce चे सीईओ Torsten Muller-Otvos हे आले होते.
रूबेन सिंह हे ब्रिटनचे प्रसिद्ध Entrepreneur आहेत. ते alldayPA आणि Isher Capital चे सीईओ सुद्धा आहेत. त्यांना ब्रिटनचे बिल गेट्स असेही म्हटले जाते. तुम्हाला आठवत असेल तर गेल्यावर्षी एक सरदारजी त्यांच्या पगडीच्या वेगवेगळ्या रंगाच्या Rolls-Royce कार ७ दिवस चालवल्याने चर्चेत आले होते. हे तेच सरदारजी आहेत.
एका इंग्रजाने त्यांच्या पगडीचा अपमान केला होता. त्यांच्या पगडीची तुलना त्या व्यक्तीने बॅंडेजसोबत केली होती. त्यामुळे पंजाबी लोकांची शान आणि पगडीचं महत्त्व दाखवण्यासाठी त्यांनी त्या इंग्रजाला एक आव्हान दिलं होतं. त्यांनी या इंग्रजाला आव्हान देत म्हटले होते की, ७ दिवस ७ वेगवेगळया रंगाच्या Rolls-Royce कार चालवू शकतो. त्यांनी तसंच केलं होतं.
केवळ रूबेन सिंह नाही तर आणखी एका भारतीय व्यक्तीचं नाव Rolls-Royce सोबत जुळलेलं आहे. ती व्यक्ती होती अलवरचे महाराजा जयसिंह. त्यांचाही कारनामा चांगलाच लोकप्रिय आहे. झालं असं होतं की, राजा जय सिंह साध्या वेशात Rolls-Royce कारच्या शोरूममध्ये गेले होते. तेथील सेल्समनने त्यांना एक सामान्य भारतीय माणूस समजून दुर्लक्ष केलं होतं. या अपमानाचा बदला घेण्यासाठी राजा दय सिंह यांनी लंडनहून ५ Rolls-Royce कार मागवल्या होत्या. या पाचही कार त्यांनी कचरा उचलण्याच्या कामी लावल्या होत्या. त्यानंतर कंपनीची बरीच बदनामी झाली होती. जेव्हा कंपनीने लिखित स्वरूपात माफी मागितली तेव्हा राजा जय सिंह यांनी कारने कचरा उचलणे बंद केलं.