Indian Railway: दे धक्का! बंद पडलेल्या ट्रेनला मजुरांनी धक्का देऊन रुळावरून हटवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 10:20 AM2021-08-30T10:20:29+5:302021-08-30T10:20:29+5:30
Indian Railway: तुम्ही रस्त्यावर बंद पडलेल्या वाहनांना धक्का मारून बाजूला नेताना किंवा सुरू करताना अनेकदा पाहिले असेल. मात्र तुम्ही कधी ट्रेनला धक्का मारताना पाहिले आहे का? मात्र अशीच एक ‘दे धक्का’ घटना समोर आली आहे.
भोपाळ - तुम्ही रस्त्यावर बंद पडलेल्या वाहनांना धक्का मारून बाजूला नेताना किंवा सुरू करताना अनेकदा पाहिले असेल. मात्र तुम्ही कधी ट्रेनला धक्का मारताना पाहिले आहे का? (Indian Railway) मात्र अशीच एक ‘दे धक्का’ घटना समोर आली आहे. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर बंद पडलेल्या एका रेल्वे निरीक्षण ट्रेनला मजुरांनी धक्का मारून मेन लाईनवरून हटवले. ही घटना मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील टिमरनी रेल्वे स्टेशनवर घडली आहे. या रेल्वेमार्गावर गाड्यांची वर्दळ असल्याने ट्रेनमध्ये बिघाड झाल्यावर तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी इंजिनाची वाट न पाहता ही ट्रेन मुख्य मार्गावरून हटवली. (The train was pushed by workers in Madhya Pradesh)
त्याचे झाले असे की, टिमरनी रेल्वे स्टेशनवरील अप ट्रॅकवर (मुंबई कडून इटारसीकडे जाणारा) ओव्हरहेड लाइन दुरुस्त करणारी ट्रेनमध्ये (टॉवर वॅगन) तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे इन्स्पेक्शन ट्रेन मेन लाईनवर उभी राहिली. तसेच ट्रॅक जॅम झाला. ज्या ट्रॅकवर ही ट्रेन बंद पडली. त्या ट्रॅकवरून मुंबईकडून हावड्याला जाणाऱ्या ट्रेनची वाहतूक होत असते. त्यामुळे ही बंद पडलेली ट्रेन बाजूला करणे आवश्यक बनले.
दरम्यान, बिघाड झालेल्या ट्रेनला बाजूला करण्यासाठी दुसरी ट्रेन येईंपर्यंत खूप उशीर झाला असता. त्यामुळे दुसरी ट्रेन येण्याची वाट न पाहता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जवळूनच मजूर बोलावण्याचा निर्णय घेतला. या मजुरांनी धक्के मारून ट्रेनला मेन लाईनवरून बाजूला केले. बिघाड झालेल्या ट्रेनला मेन लाईनवरून लूप लाईनवर आणण्यात आले. दरम्यान मजूर ट्रेनला मेन लाईनवरून हटवत असताना कुणीतरी व्हिडीओ तयार केला.
ट्रेनला धक्के मारून मेन लाईनवरून लूप लाईनवर नेण्याबाबत टिमरनी स्टेशन मास्तर अमिक पाठक यांनी सांगितले की, टॉवर वॅगनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे ही ट्रेन मेन लाईनवरून हटवण्यात आली. यादरम्यान अप ट्रॅक सुमारे दोन तास बाधित राहिला. तसेच एक ट्रेन टिमरनी स्टेशनवर थांबवून ठेवण्यात आली. दरम्यान, ट्रॅक खाली झाल्यावर ही ट्रेन मार्गस्त करण्यात आली.