इंदूर: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षेत कॉपी करण्यासाठी एका तरुणानं हद्द ओलांडली. त्यानं शस्त्रक्रिया करून कानात ब्लूटूथ बसवून घेतले. परीक्षेत कॉपी करण्यासाठी विद्यार्थ्यानं बनियानमध्ये ब्लूटूथ लावलं होतं.
इंदूरच्या एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होती. परीक्षा सुरू झाल्यानंतर जवळपास तासाभरानं महाविद्यालयात जबलपूर वैद्यकीय विद्यापीठाच्या गोपनीय पथकानं छापा टाकला. या दरम्यान एका विद्यार्थ्याकडे मोबाईल सापडला. पथकानं मोबाईल ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यातून समोर आलेली माहिती ऐकून सारेच चकीत झाले.
शस्त्रक्रिया करून ब्लूटूथ कानात बसवला असल्याचं विद्यार्थ्यानं सांगितलं. ब्लूटूथ कोणालाही दिसू नये म्हणून विद्यार्थ्यानं ही शक्कल लढवली. आणखी एका मित्रानंदेखील मायक्रो डिव्हाईस बसवल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर विद्यापीठाच्या पथकानं त्यालाही पकडलं. पथकानं त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या बनियानमध्ये ब्लूटूथ आढळून आलं.
एनबीबीएस परीक्षेदरम्यान एमजीएम महाविद्यालयाच्या २ विद्यार्थ्यांना भरारी पथकानं पकडल्याची माहिती अहिल्या विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. रेणू जैन यांनी दिली. एका विद्यार्थ्यानं डॉक्टरांच्या मदतीनं शस्त्रक्रिया करून कानात मायक्रो ब्लूटूथ बसवलं होतं. तर दुसऱ्या विद्यार्थ्यानं बनियानमध्ये स्पेशल डिव्हाईस आणि कानात ब्लूटूथ लावलं होतं, असं जैन यांनी सांगितलं.