चीनची ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाचे को-फाऊंडर आणि मुख्य जॅक मा यांनी रिटायरमेंटची घोषणा केली आहे. ते सोमवारी आपल्या कंपनीतून निवृत्ती घेत आहेत. जॅक यांचा ही कंपनी सुरु करण्याचा प्रवास कुणालाही थक्क करणारा असाच आहे. कारण एक शिक्षक ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती या प्रवासात काही कमी अडचणी आल्या नसतील. अलीबाबा सुरु करण्यापूर्व शिक्षक राहिलेले जॅक मा पुन्हा एकदा शिक्षक बनून लोकांची सेवा करणार आहेत. चला जाणून घेऊ त्यांचा प्रवास....
जॅक मा यांचा जन्म फारच सामान्य कुटूंबात झाला. त्यांचे आई-वडील फार कमी शिकलेले होते. त्यांच्या वडिलांनी केवळ ४० डॉलर महिन्याच्या रिटायरमेंट अलाऊंसवर घर चालवलं. जॅक यांनी इंग्रजीतून पदवी घेतल्यावर एका यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षक म्हणून करिअरला सुरुवात केली.
इंटरनेटच्या संपर्कात आल्यावर जॅम मा यांनी शिक्षकाची नोकरी सोडली आणि इंटरनेटशी संबंधित काही नवीन करण्याचा निश्चय केला. जॅक सांगतात की, 'जेव्हा मी पहिल्यांदा कि-बोर्डला स्पर्श केला तेव्हा मला असं वाटलं की, ही गोष्ट जग आणि चीनला बदलवू शकते'.
इंटरनेटच्या माध्यमातून लहान व्यापाऱ्यांकडून वस्तू ऑनलाईन विकत घेणे आणि विकणे याचं महत्त्व त्यांनी ओळखलं आणि यासाठी अलीबाबाची सुरुवात केली. त्यांनी १७ आणखी लोकांसोबत चीनच्या झेजियांगच्या ह्यंगझूमध्ये आपल्या अपार्टमेंटमध्ये अलीबाबाची सुरुवात केली. त्यांनी यासाठी मित्रांकडून ६० हजार डॉलर(४३ लाख रुपये)चं कर्ज घेतलं.
जॅक यांची कंपनी अलीबाबाने इंटरनेटच्या विस्तारासोबतच वेगाने यश मिळवलं. दोन दशकातच त्यांची कंपनी जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये गणली जाऊ लागली. आता त्यांच्या कंपनीची व्हॅल्यू साधारण ४२०.८ अरब डॉलर(30,284 अरब रुपये) इतकी आहे.
जॅक मा चीनचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तसेच ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. पण आता रिलायन्सचे मुकेश अंबानी यांनी त्यांना मागे टाकले. मीडिया रिपोर्टनुसार, जॅक मा यांना चीनमधील अनेक घरांमध्ये पूजलंही जातं. अनेक घरात त्यांचे फोटोही आहेत.
जॅक मा यांनी रिटायरमेंटसाठी खास दिवस निवडला आहे. ते सोमवारी ५४ वर्षांचे होणार आहेत. या दिवशी चीनमध्ये सुट्टी असते आणि याच दिवशी चीनमध्ये शिक्षक दिनही साजरा केला जातो.