तुम्ही एक रूपयांपासून ते २ हजार रूपयांपर्यंतची नोट पाहिली असेल. भारतात रिझर्व बॅंक ऑफ इंडियाकडून छापण्यात येणाऱ्या या नोटांचा वापर आपण सगळेच करतो. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा नोटेबाबत (Zero Rupee Note) सांगणार आहोत, ज्याबाबत वाचून तुम्ही अवाक् व्हाल. तुम्हाला माहीत नसेल, पण देशात झीरोचीही नोट छापली गेली होती. चला जाणून घेऊ यााबाबत...
का छापली होती झीरोची नोट?
झीरोची नोट आता आहेत तशा नोटांसारखीच होती. त्यावर महात्मा गांधी यांचा फोटोही होता. पण अनेकांना प्रश्न पडला असेल की, अखेर झीरोची नोट कशासाठी छापण्यात आली होती? या नोटेचा वापर कशासाठी केला जात होता? तर रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने या झीरोच्या नोटा छापल्या नव्हत्या. या नोटा भ्रष्टाचार मोहिमेच्या अंतर्गत छापण्यात आल्या होत्या.
या झीरोच्या नोटा छापण्याची आयडिया दक्षिण भारतातील एका NGO ची होती. २००७ मध्ये भ्रष्टाचाराविरोधात या नोटा हत्यार म्हणून सुरू करण्यात आल्या होत्या. तामिळनाडूमध्ये काम करणाऱ्या या NGO ने साधारण ५ लाख झीरो रूपयांच्या नोटा छापल्या होत्या. या नोटांवर हिंदी, तुलुगू, कन्नड आणि मल्याळम या चार भाषांमध्ये संदेश लिहिण्यात आला होता आणि या नोटा लोकांमध्ये वाटण्यात आल्या होत्या.
या नोटांवर भ्रष्टाचाराविरोधात मेसेज लिहिण्यात आले होते. या नोटांवर लिहिलं होतं की, 'भ्रष्टाचार संपवा', 'जर कुणी लाच मागितली तर, त्याला ही नोट द्या आणि घटनेबाबत आम्हाला सांगा'. लाच न देण्याची आणि न घेण्याची शपथ घेऊया. या नोटेवर महात्मा गांधी यांच्या फोटोखाली एनजीओचा फोन नंबर आणि ईमेल आयडीही दिला होता.
एनजीओच ही झीरोची नोट तयार करत होती आणि लाच मागणाऱ्या लोकांना देत होती. झीरो रूपयांची नोट भ्रष्टाचाराविरोधात एक प्रतीक होत्या.