Fact About Dogs : जगातला सगळ्यात प्रामाणिक प्राणी म्हणून श्वानाकडे पाहिलं जातं. जगभरात श्वानांची संख्याही खूप मोठी आहे. श्वानांना पाळणंही लोकांना खूप आवडतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं श्वानांसोबत एक वेगळंच नातं तयार होतं. श्वानांच्या वागण्याबाबत अनेक रिसर्च केले गेले आणि केले जातात. पण सामान्य लोकांना त्यांच्या वागण्याबाबत बऱ्याच गोष्टी माहीत नसतात.
तुम्ही जर लक्ष दिलं असेल तर तुम्हालाही माहीत असेल की, श्वान हे जास्तकरून खांब आणि गाड्यांच्या टायरवर लघवी करतात. पण कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का की, हे असं का? याचंच उत्तर आज आम्ही सांगणार आहोत. श्वानांच्या अशा वेगवेगळ्या वागण्यांचा अनेकदा अभ्यास करण्यात आला आहे. यातच श्वानांच्या लघवी करण्याच्या पद्धतीबाबत खुलासा करण्यात आलाय.
काय आहे यामागचं कारण?
डॉग एक्सपर्ट्सना त्यांच्या रिसर्चमध्ये आढळलं की, श्वान हे त्यांचा एरिया म्हणजे परिसर ठरवून घेतात. यासाठी ते खांब किंवा गाड्यांच्या टायरवर लघवी करतात. याने दुसऱ्या एरियातील श्वानांना हे कळतं की, हा एरिया आपला नसून दुसऱ्यांचा आहे. त्याशिवाय ही इतर साथीदारांसोबत संपर्क करण्याची एक पद्धतही आहे. हेच कारण आहे की, जेव्हा श्वान कुठून जातात तेव्हा त्या भागातील खांब किंवा टायरवर लघवी करत पुढे जातात. सोप्या भाषेत सांगायचं तर श्वान असं करून आपली खूण सोडून जातात.
डॉग एक्सपर्ट्स पुढे सांगतात की, श्वानांना व्हर्टिकल गोष्टींवर लघवी करणं आवडतं. श्वानांच्या लघवी करण्याच्या पद्धतीबाबत असं सांगितलं जातं की, ते नेहमीच नाकाच्या लेव्हलमध्ये लघवी करतात. कारण तिथपर्यंत पोहोचणं सोपं असतं.
टायर आणि खांबांच्या तळाशी लघवी करणं त्यांची आवडती जागा मानली जाते. त्याशिवाय जेव्हा ते जमिनीवर लघवी करतात तेव्हा लघवीचा गंध काही वेळात नष्ट होतो. तेच रबराच्या टायरवरील गंध जास्त काळ टिकतो. याचं तिसरं कारण म्हणजे श्वानांना टायरचा वास खूप आवडतो. त्यामुळेही ते लघवी करण्यासाठी टायरची निवड करतात. टायरच्या वासाने श्वान त्यांच्याजवळ येतात आणि तिथेच लघवी करतात. टायरवर लघवी करण्याचं हेही एक मोठं कारण मानलं जातं.