Naman Shahleen Love Story: प्रेमाला सीमा दिसत नाहीत, प्रेम आपोआप घडते... भारताचा नमन लुथरा आणि पाकिस्तानची शाहलीन जावेद यांची प्रेमकहाणी अशीच काहीशी आहे. 8 वर्षांपूर्वी दोघांची भेट झाली होती. त्यानंतर अनेक वर्षे वाट पाहिली, सर्व अडथळ्यांचा सामना केला पण त्या दोघांनी हार मानली नाही. सात वर्षांच्या प्रेमानंतर त्यांना लग्न करायचं होतं. दोघांच्याही घरी समजल्यावर साहजिकच पहिले विरोध झाला. त्यानंतर काय घडलं... वाचूया सविस्तर
२०१६ ला झाला होता साखरपुडा
नमन आणि शाहलीन या दोघांची प्रेमकहाणी 2015 मध्ये सुरू होते, जेव्हा पंजाबमधील बटाला येथे राहणारा नमन त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानातील लाहोरला गेला होता. यादरम्यान त्याची शाहलीनशी भेट झाली. तो शाहलीनच्या पहिल्या नजरेतच प्रेमात पडला. भारतात आल्यानंतरही दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहिले. त्यानंतर 2016 मध्ये त्यांची एंगेजमेंट झाली. हा सोहळा पाकिस्तानातच पार पडला होता.
एंगेजमेंटनंतर शाहलीन 2018 मध्ये तिच्या आई आणि मावशीसोबत भारतात आली. येथे ते सर्वजण नमनच्या कुटुंबीयांना भेटले. या संभाषणानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी नाते पुढे नेण्यास होकार दिला. पण भारत-पाकिस्तानमधील कटु संबंधांमुळे ते सोपे नव्हते. नमन हिंदू आहे, तर शाहलीन ख्रिश्चन आहे. या दरम्यान 2020 मध्ये कोरोनाचा प्रसार झाला आणि नमन-शाहलीनचे लग्न पुन्हा पुढे ढकलण्यात आले. यानंतर 2021 आणि 2022 मध्ये शाहलीनच्या कुटुंबीयांनी भारताच्या व्हिसासाठी अर्ज केला, पण त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. या दरम्यान नमन-शाहलीनच्या लग्नाच्या आशा धूसर होत होत्या, पण त्यांनी आशा सोडली नाही.
दोघांच्या घरचे नात्याबद्दल काय म्हणाले?
नमनची आई योगिता लुथरा सांगतात की, जेव्हा मुलाने पाकिस्तानी मुलीशी लग्न करण्याचे बोलले तेव्हा धक्काच बसला. हे खूप अनपेक्षित होते. नमनचे वडीलही सुरुवातीला या लग्नासाठी तयार नव्हते. पण नमनने ठरवलं होतं की तो शाहलीनशीच लग्न करायचा. त्यामुळेच थोडा वाद आणि थोडीशी चर्चा झाल्यानंतर घरातील सदस्य या नात्यासाठी तयार झाले.
दुसरीकडे, हे नाते शाहलीनच्या पालकांसाठीही सोपे नव्हते. पण मुलीच्या हट्टापुढे ते तिला नाही म्हणू शकले नाहीत. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना टोमणे मारले आणि इतक्या दूर लग्न करण्यास मनाई केली, तरीही तिच्या घरचे नमन आणि शाहलीनच्या लग्नासाठी तयार झाले.
आणि अखेर लग्न झालं...
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, शाहलीनच्या कुटुंबातील तीन सदस्यांना मार्चमध्ये भारताचा व्हिसा मिळाला आणि ते एप्रिलमध्ये भारतात आले. आणि अखेर त्यांचे लग्न झाले. याबाबत शाहलीन म्हणते- 'मनापासून एखादी गोष्ट हवी असेल, तर ती शेवटी मिळतेच. कितीही वेळ लागला तरी वाट बघेन असं मी ठरवलं होतं. अखेर त्यांचे लग्न झाले. तेही पंजाबमधील बटाला येथे. शाहलीनची आई सांगते- भारतात सलग १५ दिवस लग्नाचे विधी चालले. आम्ही सर्व इच्छा, विधी पूर्ण केले. सध्या शाहलीनने लग्नानंतर भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.