बैतूल: मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये पोलिसाकडे एक महिला अजब तक्रार घेऊन आली आहे. माझ्या डब्यातून अदृश्य शक्ती भाजी खाते, माझ्या दागिन्यांचं वजनदेखील कमी होतंय, अशा तक्रारी घेऊन महिला पोलिसांकडे गेली. यानंतर पोलिसांनी महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला. हा केवळ भ्रम असल्याचं पोलिसांनी महिलेला सांगितलं.
प्रधानमंत्री सडक योजनेत कार्यरत असणाऱ्या सहअभियंत्या श्रुती झाडे बैतूलच्या टिकारी परिसरात वास्तव्याला आहेत. 'कोणत्यातरी अदृश्य शक्तीनं माझ्या डब्यातील भाजी खाल्ली आहे. माझे दागिने जड होते. मात्र आता त्यांचं वजन कमी झालं आहे. माझ्याकडे असलेली रोख रक्कम आणि कपडेदेखील चोरीला गेले आहेत. तीन-चार दिवसांपासून माझ्यासोबत असा प्रकार घडत आहे. कोणी अज्ञात व्यक्ती आहे. ती दिसत नाही. मला त्या व्यक्तीचे केवळ पाय दिसले. तिनं पांढरे कपडे घातले होते,' अशी तक्रार झाडेंनी पोलिसांना दिली.
महिलेची तक्रार ऐकून पोलीस चक्रावले. कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असलेली महिला अशा प्रकारची तक्रार घेऊन आल्यानं पोलिसांना धक्का बसला. मला या त्रासातून सोडवा असं म्हणत महिलेनं पोलिसांकडे मदत मागितली. महिलेची तक्रार ऐकून पोलीस चकीत झाले आहेत.
कनिष्ठ अभियंता असलेल्या श्रुती झाडेंनी तक्रार नोंदवल्याची माहिती टीआय रत्नाकर हिंग्वे यांनी सांगितलं. 'एक अदृश्य व्यक्ती डब्यातील भाजी खाते, असं झाडे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. असं काही होत नाही. हा सगळा भ्रम आहे, मनाच्या कल्पना आहेत असं आम्ही त्यांना समजावलं. माणसाच्या मनात भ्रम निर्माण होतो. त्यानंतर त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं आणि मग तो जसा विचार करतो, तशाच गोष्टी त्याला दिसू लागतात, असं आम्ही झाडे यांना समजावलं. त्यांच्यासोबत कोणी मस्करीदेखील केलेली नाही,' असं हिंग्वे म्हणाले.