बॉलिवूड शहंशाह अमिताभ बच्चन यांचा 'दीवार' सिनेमा ज्यांनी ज्यांनी पाहिला असेल त्यांना त्यांचा 'बिल्ला नंबर 786' चांगलाच लक्षात असेल. या सिनेमात या बिल्ल्यामुळे अमिताभ बच्चनचा अनेकदा जीव वाचतो. असंच काहीसं प्रकरण ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्सच्या निंबिन शहरात समोर आलं आहे. पण इथे '786'चा बिल्ला नाही तर या व्यक्तीचा जीव वाचवला तो त्याच्या iPhone ने. म्हणजे त्याच्या आयफोन त्याच्यासाठी बिल्ला नंबर 786 ठरला असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
रिपोर्टनुसार, १३ मार्च रोजी सकाळी ४३ वर्षीय व्यक्तीवर एका अज्ञात व्यक्तीने धुनष्य बाणाने हल्ला केला. बाण या व्यक्तीच्या मोबाइलच्या आरपार होतो आणि त्या व्यक्तीचा जीव वाचतो. ही व्यक्ती निंबिन शहराच्या रस्त्यावर कार पार्क करून त्याच्या घरात जात होता. अशात त्याने तिथे एक व्यक्ती धनुष्यबाणसह उभा असलेला पाहिला. त्यानंतर पीडित व्यक्तीने त्या हल्लेखोर व्यक्तीचे मोबाइलवर फोटो काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अचानक त्या व्यक्तीने धनुष्यबाणाने हल्ला केला.
एनएसडब्ल्यू पोलिसांना सांगितले की, हा हल्ला फारच घातक होता. बाण त्या व्यक्तीच्या मोबाइलला भेदून त्याच्या हनुवटीपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे ते किरकोळ जखमी झाले. रूग्णालयाने त्यांना उपचारानंतर सुट्टी दिली आहे. तसेच पोलिसांना ३९ वर्षीय हल्लेखोराला अटक केली आहे.