ऑनलाइन लोकमत
जेरुसलेम, दि. १३ - माणसाने एखाद्याला मारहाण केली, हल्ला केला तर, त्याला कायद्यानुसार तुरुंगवासाची शिक्षा होते पण हाच नियम प्राण्याला लावला तर. इस्त्रायलमध्ये चक्क पंतप्रधानांच्या कुत्र्याला पाहुण्यांना चावल्याच्या आरोपाखाली अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आले आहे. स्वत: इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी फेसबुकवरुन ही माहिती दिली.
नेतान्याहून यांच्या 'काया' कुत्र्याने हनुक्काह कार्यक्रम सुरु असताना एक खासदार आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचा चावा घेतला. इस्त्रायलच्या आरोग्य नियमानुसार चावा घेणा-या कुत्र्याला दहा दिवस तुरुंगात रहावे लागते. मग भले तुम्ही त्या कुत्र्याला सर्व डोस वेळच्यावेळेवर दिले असतील किंवा, तुमच्याकडे कुत्र्याला घरात ठेवण्याचा परवाना असेल.
नेतान्याहू यांनी जुलै महिन्यात प्राणी केंद्रातून कायाला घरी आणले होते. बुधवारी रात्री कार्यक्रम सुरु असताना 'काया' खासदार शॅरेन हासकेल आणि उप परराष्ट्रमंत्र्याच्या पतीला चावली.