वाशिम : नावाजलेल्या कंपनीत किंवा प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर असलेला देखणा मुलगा, शहरात राहणारा आणि छोटे कुटुंब असलेला मुलगाच नवरा म्हणून हवा, असा अट्टाहास विवाहयोग्य झालेल्या मुलींकडून केला जात आहे. त्यामुळेच वयाची तिशी ओलांडूनही अनेक मुलांना, पगार कमी असणाऱ्यांना तसेच शेतकऱ्याला मनासारखी नवरी मिळत नसल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
मुलाच्या कुटुंबाचे आर्थिक बॅकग्राऊंड, जमीन, शेती पाहूनच अलीकडच्या काळात मुलीचा हात त्याच्या हातात दिला जात आहे. मात्र, शिक्षणानंतर बड्या कंपन्यांमध्ये लागलेली अनेक मुले कोरोनाच्या काळात बेरोजगार झाली. त्यानंतर नोकरीसाठी जागाच निघाल्या नाहीत. परिणामी, अशा मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे.
म्हणून वाढतेय विवाहाचे वय
इंजिनिअरिंग, सीए यासह इतर प्रकारचे उच्च शिक्षण घेऊन मुले पुणे, मुंबईतील मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीला लागली. कोरोना काळात मात्र अनेकांचा जॉब गेला. आता वय वाढत असताना मुलगी मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तिशी ओलांडलेली मुले लग्नासाठी नवरीचा शोध घेत आहेत; पण त्यांना ‘रिजेक्ट’ केले जात आहे.
वकिलाला वकील, डॉक्टरला हवा डॉक्टर
अलीकडच्या काळात शिकून-सवरून मुलींनी इंजिनिअर, वकील, डाॅक्टर यासह प्रशासकीय सेवेतीलही मोठमोठी पदे काबिज केली आहेत. त्यांना त्यांच्याप्रमाणेच नवरा हवा आहे. अर्थात वकिलाला वकील, डॉक्टरला डॉक्टरच नवरदेव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
४० टक्के तरुण तिशीपार
‘लोकमत’ने शहरातील तीन वधू-वर सूचक मंडळांशी जुळलेल्या लोकांसोबत चर्चा केली असता, वयाची तिशी पार केलेले साधारणत: ४०टक्के तरुण आजही लग्नासाठी नवरीच्या शोधात असल्याची माहिती मिळाली. देखणा मुलगा, चांगली नोकरी, पगार अधिक अशा अपेक्षांमुळे लग्नगाठी जुळणे कठीण झाल्याचे काहींनी सांगितले.
१० टक्के चाळिशीपार
गेल्या काही वर्षांत बहुतांश कुटुंबातील मुली उच्चशिक्षित होऊन नोकरीला लागल्या आहेत. त्या पगारही त्याच तुलनेत कमावत आहेत. यामुळे साहजिकच त्यांच्या अपेक्षा वाढल्या असून विशेषत: बेरोजगार असणाऱ्या सुमारे १० टक्के मुलांचे वय चाळिशीपार जाऊनही त्यांचे लग्न झालेले नाही.