"माझी चूक झाली, मला माफ करा"; चोराने चिठ्ठी लिहून परत केलं मंदिरातून चोरलेलं सर्व सामान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 10:09 AM2022-10-31T10:09:14+5:302022-10-31T10:10:42+5:30
जैन मंदिरात लाखो रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू आणि इतर गोष्टींची चोरी करण्यात आली. पण यानंतर चोराचं मन बदललं. त्याने सर्व सामान पुन्हा मंदिर परिसरात ठेवलं.
मध्य प्रदेशच्या बालाघाटमध्ये चोरीचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. एका जैन मंदिरात लाखो रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू आणि इतर गोष्टींची चोरी करण्यात आली. पण यानंतर चोराचं मन बदललं. त्याने सर्व सामान पुन्हा मंदिर परिसरात ठेवलं आणि निघून गेला. एवढंच नाही तर त्याने माझी चूक झाली, मला माफ करा असं म्हणत एक चिठ्ठी देखील लिहिली आहे. चिठ्ठीमध्ये त्याने चोरीनंतर माझं खूप नुकसान झालं आहे म्हणूनच मी माफी मागतो असं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लामटा येथील बाजारात शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर आहे. सोमवारी रात्री चोराने जैन मंदिरातून चांदीच्या वस्तू आणि इतर मौल्यवान वस्तुंची चोरी केली. घटनेची माहिती मिळाताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. पोलीस तपास करत असतानाच मंदिरातून चोरी झालेलं सामान एका ठिकाणी सापडलं. पंचायत भवन येथे असलेल्या एका खड्ड्यात हे सामान होतं.
जैन परिवारातील लोक पाणी भरण्यासाठी नळाजवळ पोहोचले. तेव्हा तिथे एक पिशवी सापडली. लोकांनी पिशवी पाहिली असता त्यांना त्यामध्ये चांदीची वस्तू दिसली. यानंतर याची माहिती जैन समाज आणि पोलिसांना दिली. दिगंबर जैन पंचायतीचे अध्यक्ष अशोक कुमार जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळालेलं सामान जैन मंदिराचं आहे. तर पोलिसांनी चोराचा शोध घेण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.