आपण आपल्या संसदेतील गोंधळ नेहमीच बघत असतो. कुणी झोपा काढत असतं तर कुणी मोबाइलमध्ये डोकं घालून बसलेले असतात. पण या अशा विचित्र घटना केवळ आपल्याच संसदेत घडतात असं नाही. आता हेच बघा ना...इटलीच्या संसदेत एका खासदारांनी सभागृहाच्या कामकाजादरम्यान सगळ्यांसमोर गर्लफ्रेन्डला लग्नासाठी प्रपोज केलं. एका महत्वाच्या मुद्द्यावरून सभागृहात चर्चा सुरू होती. ती चर्चा थांबवून या खासदाराने त्याच्या गर्लफ्रेन्डला प्रजोज केलं. यावेळी त्यांची गर्लफ्रेन्ड प्रेक्षकांमध्ये बसली होती.
ही घटना गेल्या गुरूवारी घडली. तर खासदारांचं नाव फ्लेवियो डी मुरो असं आहे. तर त्यांच्या गर्लफ्रेन्डचं नाव एलिसा डी लिओ आहे. एलिसाने मुरो यांचं लग्नाचं प्रपोजल स्वीकारलं. त्यानंतर सभागृहातील इतर खासदरांनी त्यांचं अभिनंदनही केलं.
असं असलं तरी सभागृहाचे अध्यक्ष रॉबर्टो फिको यांनी चर्चेदरम्यान खासदार फ्लेवियो यांनी केलेल्या कारनाम्यावर नाराजी व्यक्ती केली. ते म्हणाले की, 'मी तुमच्या या कारनाम्याने प्रभावित नक्कीच झालो, पण सभागृहाच्या कामकाज थांबवून असं करणं योग्य नाही'. ज्यावेळी खासदार महोदयांनी गर्लफ्रेन्डला प्रपोज केलं तेव्हा सभागृहात भूकंपानंतर पुर्ननिर्माणावर चर्चा सुरू होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्लेवियो आणि एलिसा गेल्या सहा वर्षांपासून इटलीच्या वेंटीमिग्लियामध्ये एकत्र राहतात. एलिसा त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनात सर्वात जवळची व्यक्ती आहे. ३३ वर्षीय खासदार फ्लेवियो डी मुरो यांनी गेल्यावर्षी मार्चमध्ये विजय मिळवला होता. ते लीग पार्टीचे सदस्य आहेत.