चायनीज पदार्थ खाणाऱ्या लोकांना Fried Rice अनेकदा खाल्ला असेल. पण इटलीतील एका हॉटेलमध्ये लोक चक्क Fried Air म्हणजेच तळलेली हवा खात आहेत. कॅशलफ्रेंको वेनितो शहरातील या हॉटेलमध्ये Fried Air नावाची डिश मिळते. बाजारात वाढलेल्या स्पर्धेमुळे या हॉटेलने ही डिश तयार करणे सुरु केले होते. काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने ही डिश समोर आली.
कशी तयार करतात ही डिश?
या हॉटेलचं नाव 'फीवा' असं आहे. निकोला दिनातो याचे हेड शेफ आहेत. त्यांनी सांगतिले की, 'आम्हाला काहीतरी फ्रेश आणायचं होतं. त्यासाठी आम्ही ही डिश सुरु केली आणि याला 'अरिता फ्रीता' म्हणजेच फ्राइड एअर असं नाव दिलं'. आता सर्वांना प्रश्न पडला असेल की, ही डिश तयार कशी केली जाते. खरंतर या डिशचं नाव थोडं ट्रिकी आहे. कारण ही डिश मुळात साबूदाणाच्या सालीपासून तयार केली जाते. यात आधी साबूदाण्याच्या सालीला भाजलं जातं आणि नंतर डिप फ्राय केलं जातं.
यात हवा कुठेय?
तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की, यात हवा कुठे आहे? कारण डिशचं नाव तर 'फ्राइड एअर' आहे. तर साबूदाण्याची साली जेव्हा फ्राय केली जाते, तेव्हा नंतर ती १० मिनिटे हवेत ठेवली जाते. त्यानंतर ती कॉटन कॅंडीवर ठेवून सर्व केली जाते. म्हणजे मुद्दा हा की, ही डिश हवेत ठेवून नंतर सर्व केली जाते. म्हणजे आता तुम्हाला या डिशच्या नावातील ट्रिक कळाली असेलच.
कधी फ्रि तर कधी २१०० रुपये
फ्राइड एअर नावाची ही डिश सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. साधारण महिनाभरापूर्वी ही डिश सुरु करण्यात आली होती. या हॉटेलकडून या डिशसाठी ३० डॉलर म्हणजे २१०० रुपये घेतले जातात. तर हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, इथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला ही डिश मोफत दिली जाते.