तुम्ही पुरेशी झोप घेता का? या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये शांतपणे निदान ६ तासांपेक्षा जास्त झोपता का? जर उत्तर हो असेल तर जपानमधील या कंपनीत तुम्ही जायला हवे. कारण जपानमधील एक कंपनी आपल्या त्या कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त बक्षीस देतात, जे चांगली झोप घेऊन ऑफिसला येतात. ही गंमत नाही तर खरं आहे.
कंपनीचं म्हणनं आहे की, बिझनेस वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांची झोप चांगली होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांनी पुरेशी झोप घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीचे प्रमुख केजूहिको मोरियामा म्हणाले की, आम्हाला कर्मचाऱ्यांच्या अधिकारांची रक्षा करणे गरजेचे आहे. नाही तर देश आपोआप कमजोर होईल.
क्रेझी इंक ही लग्नांचं आयोजन करणारी कंपनी आहे. या कंपनीत आठवड्यातील पाच दिवस कमीत कमी ६ तास झोप घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण वर्षभर अवॉर्डमध्ये काही पॉईंट देतात. याची किंमत ५७० डॉलर(४१ हजार रुपये) आहे. हे रुपये ते ऑफिसमधील कॅन्टीनमध्ये खर्च करु शकतात. ही कंपनी झोपेशिवाय चांगलं पोषण, व्यायाम आणि ऑफिसमधील सकारात्मक वातावरणाला प्रोत्साहन देतं.
फुजी रियोकी नावाच्या कंपनीने केलेल्या सर्वेनुसार, २० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ९२ टक्क्यांपेक्षा अधिक जपानी लोकांनी सांगितले की, त्यांना पुरेशी झोप घ्यायला मिळत नाही. काही रिपोर्ट्सचा हा दावा आहे की, जपानी लोक हे जास्त श्रम करत असल्याने ते मृत्यूमुखी पडत आहेत.