अनेक देशांमध्ये वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी 'हम हो हमारे दो' असा नारा दिला जात आहे. आता तर 'हम दो, हमारा एक' असाही नारा आला आहे. पण ज्या देशांची लोकसंख्या कमी आहे, त्या देशांचं काय? जपानमधील एका शहरात सरकारने लोकसंख्य वाढवण्यासाठी एक अनोखं पाऊल उचललं आहे. येथील सरकार जोडप्यांना मुलं जन्माला घालण्यासाठी बक्षीस म्हणून लाखो रुपये देत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बक्षिसाची रक्कम वाढत जाते. म्हणजे पहिलं बाळ जन्माला घातलं तर त्यासाठी बक्षीस म्हणून ६० हजार रुपये तर ५ व्या बाळाला जन्म दिला तर २.५ लाख रुपये बक्षीस दिलं जात आहे.
जपान सध्या तरुण आणि लहान मुलांच्या घटत्या संख्येमुळे अडचणीत आला आहे. याच कारणामुळे येथील वृद्धांची सख्या वाढत आहे. या शहरात जन्मदर दिवसेंदिवस कमी होत आहे. या समस्येला दूर करण्यासाठी जपानी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. सरकारने नागरिकांना बाळाला जन्म देण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा आणि सोबतच बक्षीसही देणे सुरु केले आहे.
६ हजार आहे या शहराची लोकसंख्या
मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण जपानमध्ये असलेल्या नागी शहराची लोकसंख्या केवळ ६ हजार इतकी आहे. हे एक कृषीप्रधान शहर आहे. या शहरातील लोकांची प्राथमिकता पैसे नसून चांगलं जीवन आहे. २००४ पासून या शहरातील कपल्सना बक्षीसे देऊन बाळाला जन्म देण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे.
जास्त मुलं म्हणजे जास्त पैसा!
या शहरात मुलांच्या संख्येच्या आधारावर जोडप्यांना बक्षिस दिलं जात आहे. जर परिवारात पहिलं बाळ जन्माला येत असेल तर सरकार त्यांना १ लाख येन(६३ हजार रुपये) इतकं बक्षीस आहेत. दुसरं बाळ जन्माला आलं तर १,५००० येन(९५ हजार रुपये). तर पाचव्या बाळासाठी ४ लाख येन(२.५ लाख रुपये) बक्षीस दिलं जात आहे. इतकेच नाही तर सरकार परिवारांना स्वस्त घरे अशाही काही सुविधा देत आहेत.
संयुक्त कुटूंबाला प्राधान्य
या शहरातील लोकांना एकत्र राहणं पसंत आहे. ३० वयाआधीच लग्न झालं असून सुद्धा तरुणांना आपल्या आई-वडिलांसोबत रहायचं आहे. घरात वृद्ध असल्याने त्यांना लहान मुलांचा सांभाळ करण्याची चिंताही कमी असते.
जन्मदरात होतीये वाढ
सरकारच्या या प्रयत्नांना यश मिळतानाही दिसत आहे. रिपोर्टनुसार, २००५ ते २०१४ दरम्यान या शहरात एका महिलेकडून सरासरी बाळाला जन्म देण्याचा दर १.४ वरुन २.८ इतका झाला आहे.
जपानच्या लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढत आहे. जपानमधील २० टक्के लोकसंख्या ही ६५ वयापेक्षा जास्त आहे. २०१८ मध्ये जपानमध्ये आतापर्यंत ९,२१,००० बाळांचा जन्म झाला, जे गेल्यावर्षीच्या तुलनेत २५ हजारांनी कमी आहेत. २०१८ मध्येच जपानमध्ये १३ लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यूही झालाय.