शिस्तीच्या बाबतीत जपानचं उदाहरण जगभर दिलं जातं. मात्र, अनेकवेळा जपानमध्येही अशा घटना घडतात, ज्या ऐकून आपण थक्क होतो. असाच काहीसा प्रकार जपानमधील एका शाळेत घडला आहे, जिथे शिक्षकाने पाण्याच्या टाकीचा नळ सुरूच ठेवला. त्यामुळे शाळेला २० लाखांचं पाण्याचं बिल आलं आहे (School Gets 20 Lakh’s Water Bill).
पाण्याची टाकी महिनाभर उघडी ठेवणाऱ्या शिक्षकाची माहिती अद्यापपर्यंत शाळेला मिळू शकलेली नाही. मात्र बिलानुसार हा नळ जूनच्या अखेरीपासून सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत सुरूच राहिला आणि जेव्हा जेव्हा पाणी पुरवठा झाला तेव्हा यातील पाणी वाहत राहिलं. एएफपीच्या वृत्तानुसार, अनेक वेळा कर्मचाऱ्यांनी नळ बंदही केला होता, पण आरोपी शिक्षक तो पुन्हा उघडत असे.
रिपोर्ट्सनुसार, स्विमिंग पूलचं पाणी सतत क्लोरीन आणि फिल्टरिंग मशिनद्वारे स्वच्छ केले जातं. परंतु शिक्षकाच्या मनात अशी विचित्र कल्पना आली की, स्विमिंग पूलमध्ये सतत नवीन पाणी भरल्यामुळे, यात कोरोनाचा संसर्ग होणार नाही. स्थानिक शिक्षण मंडळाचे अधिकारी अकिरा कोजिरी यांनी सांगितलं की, या टाकीचा नळ बंद करण्यासाठी अनेक लोक यायचे. पण काही वेळातच आरोपी शिक्षक पुन्हा ते सुरू करायचा. महिन्यांत सुमारे ४ हजार टन पाणी जलतरण तलावात भरलं आणि वाहून गेलं.
पाण्याचा हा अपव्यय तेव्हा उघडकीस आला जेव्हा जपानच्या योकोसुका स्थानिक प्राधिकरणाकडून ३.५ दशलक्ष येन बिलाची मागणी केली गेली. हे शिक्षक आणि २ पर्यवेक्षकांना मिळून भरावे लागेल. याआधी न्यू जर्सीमध्ये एका २ वर्षाच्या मुलाने आईच्या फोनवरून दीड लाखांची खरेदी केल्याची घटना समोर आली होती. मुलाने आईच्या शॉपिंग कार्टमधील सर्व वस्तू ऑर्डर केल्या होत्या, त्यानंतर ते घरी पोहोचवलं गेलं आणि मग मुलाची चूक लक्षात आली.