न्यूयॉर्क - दक्षिणेतील ‘मक्खी’ सिनेमा आठवतो का? याचा हिंदी डब चित्रपट आपल्याकडेही गाजला. त्यात अनेक प्रसंगांतून मक्खी स्वत:चा बचाव करते. तशा प्रकारची मक्खी अर्थात माशी एका वृद्धाच्या पोटात गेली आणि आतड्यांत जाऊन काही दिवस जिवंतही राहिली.
विचार करा. ती खाद्यपदार्थांतून तोंडात गेली असेल. दातांच्या आक्रमणाचा तिने सामना केला असेल. मग अन्ननलिकेतून वेगाने खाली गेली असेल. पाण्याचा मारा झाला असेल. नंतर ती आतड्याच्या चिंचोळ्या गल्लीत विसावली असेल. तेही सोडा. तिथे असलेले एन्झाइम्स आणि ॲसिडदेखील या माशीला मारू शकले नाहीत. अखेर डॉक्टरांना तिला बाहेर काढून मारावे लागले. आता बोला! (वृत्तसंस्था)
कसे कळले?- अमेरिकेतील ६३ वर्षीय वृद्धाला कोलन कॅन्सर आहे. तो तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेला. त्याच्या आतड्यांमध्ये डॉक्टरांना एक जिवंत माशी दिसली. ती राहून-राहून वर उडण्याचा प्रयत्न करीत होती.- डॉक्टर हैराण झाले. त्यांना प्रश्न पडला- एकतर ही इथपर्यंत आली कशी आणि आल्यावर जिवंत राहिली कशी? अत्यंत दुर्मीळ कोलोनोस्कोपिक संशोधनाशी संबंधित हे प्रकरण असल्याचे डॉक्टर सांगतात.