राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात गाईबाबतचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. चुरू येथील सरदारशहर येथे एका गाईच्या मालकी हक्काबाबत दोन पशुपालकांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा वाढला की सुमारे दोन वर्षे तो पोलीसा ठाण्यामध्ये प्रलंबित होता. अखेर ही गाय कुणाची हे शोधून काढण्यासाठी पोलिसांनी एक कल्पना लढवली. पोलिसांनी ही गाय आणि तिच्या आईची डीएनए टेस्ट करून घेतली. दोन दिवसांपूर्वी डीएनए टेस्टचा अहवाल आल्यानंतर या केसचा निकाल लागला. तसेच ही गाय तिच्या खऱ्या मालकाच्या ताब्यात देण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना ही सरदारशहर येथील रामनगरबासयेथील वॉर्ड १ मधील आहे. रामनगर येथील ७० वर्षीय पशुपालक दूलाराम डारा याची गाय सुमारे १८ महिन्यांपूर्वी ८ डिसेंबर २०२१ रोजी चोरीस गेली होती. यादरम्यान, एका ग्रामस्थाने फोन करून ही गाय माझ्या दुकानासमोर उभी आहे, असे सांगितले. तेव्हा दूलाराम गाय घेऊन आला. मात्र हे प्रकरण इथेच थांबलं नाही. दूलाराम गाय घेऊन आल्यानंतर त्याच परिसरातील परतूराम आणि इतर काही ग्रामस्थ त्याच्या घरी आले.
यातील परतूराम याने ही गाय आपली असल्याचा दावा केला. तसेच धाकदपटशाही करून ही गाय ते घेऊन गेले. त्यानंतर दूलाराम याने १४ डिसेंबर २०२१ रोजी सरदारशहर पोलीस ठाण्यात याविरोधात तक्रार दाखल दिली. मात्र ही तक्रार दाखल करून घेण्याता आली नाही. त्यानंतर दूलाराम आपली तक्रार घेऊन पोलीस अधीक्षकांच्या समक्ष हजर झाला. त्याने आपली व्यथा सांगितली. त्यानंतर एसपींच्या आदेशानुसार २१ डिसेंबर २०२१ रोजी याबातची तक्रार नोंदवून घेण्यात आली.
पोलिसांनी केस दाखल करून घेतली. मात्र कटकट टाळण्यासाठी त्याच्यावर एफआर लावली. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन दूलाराम यांनी सहा महिन्यांपूर्वी बीएसएनएलच्या टॉवरवर चढून आंदोलन केलं होतं. योगायोगाने त्याच दिवशी मुख्यमंत्री अशोक गहलोत त्या भागामध्ये आले होते. प्रकरण वाढू नये म्हणून पोलिसांनी या आंदोलनाची दखल घेतली. बीकानेरच्या आयजींनी गाय चोरीच्या प्रकरणाचा तपास अधिकारी बदलून तारानगरचे डीएसपी ओमप्रकाश गोदारा यांच्याकडे सोपवला.
त्यानंतर गाय कुणाची हे शोधण्यासाठी नव्याने तपास करण्यात आला. त्यावेळी दूलारामने या गाईची आई आपल्या घरीच असल्याचे सांगितले. तसेच आपल्या जुन्या गाईच्या वासराला आपल्याकडून जबरदस्तीने हिसकावल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी दूलारामच्या घरातील गाय आणि वादग्रस्त गाय यांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला.
ही डीएनए चाचणी हैदराबादमध्ये होत असल्याने तपासाचे नमुने तिथे पाठवण्यात आले. तिथून दोन दिवसांपूर्वी या चाचणीचा रिपोर्ट आला. डीएनए रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांनी २० मे रोजी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करत सदर गाय तिचा खरा मालक असलेल्या दूलारामकडे सुपुर्द केली.