लंडन - पेशाने लॉरी ड्रायव्हर असलेल्या एका व्यक्तीला जमिनीखालून मौल्यवान अंगठी सापडली. १४ व्या शतकातील ही अंगठी ३७ लाख रुपयांना विकली गेली. अनेक वर्षांपासून जमिनीखाली गाडलेली ही अंगठी या व्यक्तीला मित्राच्या फार्महाऊसमध्ये सापडली. जेव्हा या व्यक्तीला ही अंगठी सापडली तेव्हा ती चिखलाने माखली होती.
६९ वर्षीय डेव्हिड बोर्ड यांना सुरुवातीला वाटले की, त्यांना एक स्वीट रॅपर मिळाला आहे. मात्र जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा ही सोने हिऱ्याने जडवलेली जुनी अंगठी असल्याचे निष्पन्न झाले.
डेव्हिडला ही अंगठी ब्रिटनमधील डोरसेट येथील बॉलिंग ग्रीन फार्महाऊसमध्ये सापडली. डेव्हिडने सांगितले की, ही अंगठी जमिनीमध्ये ५ इंच आत दबलेली होती. मात्र या अंगठीला मिळालेल्या अनपेक्षित किमतीबाबत पाहून डेव्हिड यांना आश्चर्याचा धक्का बसला. या अंगठीवर फ्रेंच भाषेत खास संदेश लिहिलेला आहे. ज्या प्रकारे मी तुझा विश्वास सांभाळला आहे. त्याचप्रमाणे तुही सांभाळ, असे या अंगठीवर लिहिलेले आहे. या अंगठीची लिलावामधून विक्री करण्यात आली.
ज्या फार्महाऊसमध्ये डेव्हिड याला ही अंगठी सापडली, ते फार्महाऊस १४व्या शतकात सर थॉमस ब्रुक यांच्या मालकीचे होते. ही अंगठी थॉमस ब्रुक यांनीच आपल्या पत्नीला लग्नावेळी सन १३८८ मध्ये दिली होती, अशा दावा करण्यात येत आहे. थॉमस ब्रुक हे त्या काळातील मोठे जमीनदार होते. तसेच ते १३ वेळा खासदारही राहिले होते. नूनन्सकडून लंडनमध्ये झालेल्या लिलावामधून मिळालेली रक्कम डेव्हिड हे त्यांच्या मित्रांसोबत वाटणार आहेत.