भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये आदिवासी बहुल अलीराजपूर जिल्ह्यामध्ये एका वराने आदिवासी रीतीरिवाजानुसार आपल्या ३ प्रेयसींसह सप्तपदी घेतली. त्याने हा विवाह प्रेमिकांपासून झालेल्या सहा मुलांच्या उपस्थितीत केला. हा विवाह करणाऱ्या वराचं नाव समरथ मौर्या असे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नानपूर परिसराचा माजी सरपंचही राहिला आहे.
वर समरथ मौर्या आणि त्याची मुले या विवाहामुळे खूप खूश आहेत. त्यांनी विवाहामध्ये जोरदार डान्सही केला. यादरम्यान, स्थानिक लोकही विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. विवाहाच्या लग्नपत्रिकेमध्ये वराच्या नावासोबत त्याच्या तिन्ही प्रेमिकांचं नावही छापण्यात आलं होतं. वराने दिलेल्या माहितीनुसार १५ वर्षांपूर्वी गरीब होतो. त्यामुळे विवाह करू शकलो नव्हतो. त्यामुळे मी आता विवाह करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या १५ वर्षांदरम्यान, समरथ मोर्या हा तिन्ही तरुणींच्या प्रेमात पडला होता. त्याने या तिघींना एक एक करून त्यांना पळवून आणले होते आणि घरात पत्नी म्हणून ठेवले होते.
भिलाला आदिवासी समुदायामध्ये लिव्ह इनमध्ये राहण्याची आणि मुले जन्माला घालण्याची सवलत आहे. मात्र जोपर्यंत विधिपूर्वक लग्न होत नाही तोपर्यंत अशा व्यक्तींना मंगल कार्यात सहभागी होण्याची परवानगी नसते. त्यामुळे १५ वर्षे आणि ६ मुले झाल्यानंतर त्यांनी विवाह केला.
भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४२ आदिवासी रीतीरिवाज आणि विशिष्ट्य सामाजिक परंपरांना संरक्षण देते. त्यामुळे या कलमातील तरतुदीनुसार समरथ मौर्या यांच्यासोबत तीन वधूंनी केलेला विवाह हा बेकायदेशीर मानला जाणार नाही.