भारतामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यांची फारशी माहिती आपल्या देशातील बहुतांश लोकांना नसते. आपल्या देशात एक असा गाव आहे जिथे तुम्ही प्लॅस्टिक घेऊन गेलात तर तुम्हाला त्याच्या बदल्यात सोन्याचं नाणं मिळू शकतं. काही काळापूर्वी तिथे ही घोषणा झाल्यानंतर तेथील रहिवासी एकदम श्रीमंत झाले होते. हे गाव आहे काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये. या गावाचं नाव आहे सादिवारा. काही काळापूर्वीच तिथे ही घोषणा झाली होती.
याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार या गावच्या सरपंचांनी प्लॅस्टिकपासून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ही योजना सुरू केली होती. या गावचे सरपंच फारुख अहमद गनई यांची गावाला प्लॅस्टिकमुक्त बनवण्याची इच्छा होती. पेशाने वकील असलेल्या गनई यांनी त्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. पण त्यात फारसं यश येत नव्हतं. अखेरीस त्यांनी राबवलेल्या या नव्या कल्पनेमुळे गावाचं नशीबच बदलून गेलं.
त्याचं झालं असं की, गावच्या सरपंचांनी प्लॅस्टिक द्या आणि सोनं घ्या नावाचं अभियान सुरू केलं होतं. या योजनेंतर्गत जर कुणी २० क्विंटल प्लॅस्टिकचा कचरा दिला तर त्याला ग्रामपंचायत एक सोन्याचं नाणं देईल, अशी घोषणा करण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. तसेच अभियान सुरू झाल्यापासून १५ दिवसांमध्ये गाव प्लॅस्टिकमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली. गतवर्षी या अभियानाला खूप लोकप्रियता मिळाली होती. मात्र कचरा गावातीलच असावा, अशी एक अट या योजनेसाठी घालण्यात आली आहे.
जर कुणी बाहेरील व्यक्ती आली तरीही त्याला गावातील कचराच जमा करावा लागेल. म्हणजेच तुम्ही तिथे जाऊन प्लॅस्टिकच्या बदल्यात सोन्याचं नाणं मिळवू शकता. मात्र तुम्हाला त्यासाठी त्या गावातच कचरा गोळा करून तो जमा करावा लागेल. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर इतर गावातील ग्रामपंचायतींनीही त्याचे अनुकरण केले.