कराची - या जगात वेगवेगळे लोक आहेत. त्यांचं त्यांचं नशिबही वेगवेगळं असतं. कुणी मोठ्या घरात आलिशान जीवन जगतो, तर काही लोक असेही आहेत ज्यांना राहण्यासाठी जमिनीचा एक तुकडाही मिळत नाही. अशाच लोकांमध्ये पाकिस्तानमधील कराची येथे राहणाऱ्या फरमान अली याचा समावेश होतो. ते गेल्या आठ वर्षांपासून एका झाडावर वास्तव्य करून आहेत.
सर्वसाधारणपणे पक्षी झाडावर घरटे बांधून राहतात. मात्र फरमान अलीने झाडावर आपल्यासाठी बांबू आणि लाकडं जोडून एक खोली तयार केली आहे. या अॅडव्हेंचरस खोलीमध्ये ते गेल्या आठ वर्षांपासून राहत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांना कुणाबाबतही कसलीही तक्रार नाही आहे. तसेच गेल्या आठ वर्षांपासून सार्वजनिक ठिकाणी झाडावर राहत असलेल्या फरमान याला कुणीही रोखलेले नाही.
फरमान अली सध्या सोशल मीडियावर सेन्शेशन बनले आहेत. कारण यापूर्वी लोकांनी कुणालाही एवढी वर्षे झाडावर राहिलेले पाहिलेले नाही, तसेच ऐकलेलेही नाही. लोक फरमान अली याला पाहण्यासाठी येथे येतात. फरमान सांगतो की तो आपल्या इच्छेने इथे राहत नाही. त्याच्याकडे राहण्यासाठी दुसरे घर नाही आहे. त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. तसेच भाऊ बहिणी वेगळे झाले आहेत. आता त्याच्याकडे राहण्यासाठी कुठलेही घर नाही आहे. अशा परिस्थितीत तो पार्कमध्ये एका झाडावर आसरा शोधून राहक आहे, मात्र त्याला येथून कुणीही हाकलण्याचा प्रयत्न केलेला नाही. उलट कराचीमधील लोक त्याला कराचीचा टारझन, ट्रीमॅन अशा नावांनी संबोधतात.
२८ वर्षांच्या फरमान अलीची कहाणी पाकिस्तानमधील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आता लोक त्याच्या विचारांचं कौतुक करत आहेत. एआरवाय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार फरमानने त्याच्या नातेवाईकांकडे आणि भाऊ-बहिणींकडे मदत मागितली होती. मात्र कुणीही त्याच्या मदतीसाठी पुढे आलेलं नाही. त्याचं लग्नही झालं होतं. मात्र आर्थिक चणचणीमुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली.
त्यानंतर तो शेवटचा पर्याच म्हणून तो झाडावरच घर बांधून राहू लागला. बांबू-लाकूड, जुने दरवाजे, पडदे अशा वस्तूंचा वापर करून त्याने घर बांधले. मात्र पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्याला खूप समस्यांचा सामना करावा लागतो. त्याने घरामध्ये चूलही तयार केली आहे. त्याने शेजाऱ्यांकडून चार्जरसाठी कनेक्शनही घेतलं आहे. तसेच एक विजेचा दिवाही लावला आहे.