उंची हा आपल्याकडे अनेक जणांचा प्रश्न आहे. उंची वाढवण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न अनेकजण करीत असतात. असे फार थोडे सुदैवी आहेत, ज्यांना योग्य उंची मिळालेली आहे. त्यांना आपल्या उंचीचा अभिमानही असतो, पण जगात काहीजण जरा जास्तच ‘सुदैवी’ असतात आणि या सुदैवी असण्यामुळे त्यांना अडचणीही येतात. काही दिवसांपूर्वी याच सदरात रशियन मॉडेल आणि रशियाच्या बास्केटबॉल संघाची ऑलिम्पिक ब्राँझ पदक विजेती खेळाडू इकाटेरिना लिसिना हिची माहिती प्रसिद्ध झाली होती. अनेक पातळ्यांवर अलौकिक कामगिरी करूनही तिला अनंत अडचणींचा सामना करावा लागला होता. देशासाठी तिनं ऑलिम्पिक ब्राँझ पदक जिंकलं, मॉडेलिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली, रशियन सुंदरी म्हणून तिचं नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदलं गेलं, पण केवळ तिच्या उंचीमुळे तिला आजही आयुष्याचा जोडीदार मिळालेला नाही. कॅनडाचा असाच एक टिनएजर तरुण आता चर्चेत आला आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनं जगातील सर्वांत उंच टिनएजर म्हणून जाहीर केलेल्या एका तरुणाचा व्हिडिओ परवाच सोशल मीडियावर शेअर केला. आपल्याच घरात जाण्यासाठीही त्याला किती वाकावं लागतं, काय काय करावं लागतं, यासंदर्भातला हा व्हिडिओ आहे. अल्पावधीतच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. केवळ काही तासांतच जगभरातील तब्बल आठ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. जगातल्या सर्वांत उंच असलेल्या या टिनएजर तरुणाचं नाव आहे ऑलिव्हर रिऑक्स. आत्ताशी तो केवळ १६ वर्षांचा आहे. आपल्या उंचीमुळे बास्केटबॉल हा खेळ तो खेळतो. किती असावी या तरुणाची उंची? रिऑक्सची उंची आहे सात फूट ५.३३ इंच म्हणजेच २२६.९ सेंटीमीटर!अर्थातच टिनएजर म्हणून जगातला सर्वांत उंच तरुण असल्याचा किताब त्याला आज मिळालेला नाही. गेल्या वर्षी म्हणजे तो १५ वर्षांचा असतानाच जगातला सर्वांत उंच टिनएजर ठरला. या घटनेला उजाळा देताना गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनं त्याचा नवा व्हिडिओ फक्त शेअर केला आणि त्यावर जगभरात चर्चा सुरू झाली.बास्केटबॉल खेळात ऑलिव्हरला आपल्या उंचीचा खूप फायदा होतो, त्याच्या उंचीमुळे तो सगळीकडे प्रसिद्ध आहे, तो जिथे जातो तिथे लोक त्याच्याकडे मान वर करून पाहतात, कुठल्या कार्यक्रमात किंवा गर्दीच्या ठिकाणी तो असला, तर फोटोग्राफर्सना थेट टेबलावर चढून त्याचा फोटो काढावा लागतो, अनेकजण कौतुकानं त्याच्यासोबत फोटो काढून घेतात, पण आपल्या याच उंचीमुळे ऑलिव्हरला अनेक तडजोडी कराव्या लागतात. त्याच्या पायाच्या मापाचे बूट तर अख्ख्या जगभरात कुठेच मिळत नाहीत. कारण त्याला लागतो वीस नंबरचा बूट ! हे तर काहीच नाही, आपल्याच घराची उंची पुरत नाही म्हणून स्वत:च्याच घराची मोडतोड त्याला आणि त्याच्या पालकांना करावी लागली, घराचं छत तोडून टाकावं लागलं, भिंत उंच करावी लागली आणि नव्यानं त्यावर छत घालावं लागलं! केवळ उंचीमुळे आपलंच घर तोडायची वेळ आलेलाही तो जगातला एकमेव व्यक्ती आहे ! रिऑक्स जन्माला आला तेच लोकांसाठी एक आश्चर्य बनून. तो जन्माला आला, त्यावेळी त्याचं वजन होतं तब्बल साडेसात पाऊंड. पहिल्याच महिन्यात त्याचे वजन १६ पाऊंड्सपर्यंत वाढलं. नुसतं वजनच नाही, त्याची उंचीही अतिशय झपाट्यानं वाढत गेली. तो जेव्हा पाचवीत होता, त्याचवेळी त्याची उंची पाच फूट दोन इंच इतकी होती ! वयाच्या १५ व्या वर्षीच तो जगातील सर्वाधिक उंचीचा टिनएजर ठरला ! ऑलिव्हर जेव्हा जन्माला आला, त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं होतं, त्याची उंची खूप म्हणजे साधारण साडेसहा फुटापर्यंत वाढू शकेल. पण, ऑलिव्हरनं डॉक्टरांचा अंदाजही खोटा ठरवला. याआधी जगातील सर्वांत उंच टिनएजरचा विक्रम चीनच्या रेन कीयू याच्या नावावर होता. त्याची उंची सात फूट तीन इंच होती. ऑलिव्हरचे आई-वडीलही चांगलेच उंच आहेत. तोच वारसा त्यालाही मिळाला. ऑलिव्हरच्या आईची उंची आहे सहा फूट दोन इंच, तर त्याच्या वडिलांची उंची आहे सहा फूट आठ इंच !
टेबल, खुर्चीवर उभं राहून होते भेट !ऑलिव्हर जगातला सर्वांत उंच टिनएजर असला, त्यामुळे त्याला अडचणी येत असल्या तरी त्याची त्याबद्दल काहीच तक्रार नाही. उलट आपल्या उंचीचा त्याला अभिमानच वाटतो. त्याच्या उंचीमुळे इन्स्टाग्रामवर त्याचे सुमारे २८ हजार फॉलोअर्स आहेत. आपल्या उंचीमुळे होणाऱ्या गमतीजमती तो अधूनमधून आपल्या अकाऊंटवर शेअरही करीत असतो. युजर्स आवडीनं ते पाहतात, वाचतात. त्याच्या उंचीमुळे अनेक गोष्टींशी त्याला तडजोड करावी लागत असली, तरी लोकांनाही आपल्या उंचीमुळे आपल्याशी कसं ॲडजेस्ट करावं लागतं, खुर्ची, टेबल, खिडक्यांवर चढून त्यांना ‘आपली उंची’ वाढवावी लागते, हेदेखील तो गमतीनं सांगत असतो.