Jara hatke: हत्तीची ‘सटकली’; बस ८ किमी रिव्हर्स नेली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 09:02 AM2022-11-18T09:02:12+5:302022-11-18T09:02:31+5:30
Jara hatke: केरळमधील त्रिशूरमध्ये बसचालकाने संकटकाळात संयम दाखवत खासगी बस तब्बल ८ किमीहून अधिक अंतरापर्यंत रिव्हर्स गिअरमध्ये चालवून सुमारे ४० लोकांचे प्राण वाचवले.
जंगलाचा वळणदार रस्ता, प्रवाशांनी भरलेली बस आणि समोर चिडलेला जंगली हत्ती. बस मागे वळवण्यासाठीही रस्ता नाही. अशा परिस्थितीत कोणाचाही संयम सुटू शकतो, पण केरळमधील त्रिशूरमध्ये बसचालकाने संकटकाळात संयम दाखवत खासगी बस तब्बल ८ किमीहून अधिक अंतरापर्यंत रिव्हर्स गिअरमध्ये चालवून सुमारे ४० लोकांचे प्राण वाचवले. मंगळवारी चालकुडी-वालपराई मार्गावर अचानक बससमोर हत्ती आला. बसला टक्कर मारण्यासाठी जणू तो रागात बसच्या दिशेने धावत येत होता. चालक अंबुजाक्षन यांनी रिव्हर्स गिअरमध्ये बस मागे पळवायला सुरुवात केली. हत्ती परत फिरायला तयार नव्हता, उलट तो बसचाच आक्रमकपणे पाठलाग करत होता. हत्तीने थकून पाठलाग करणे थांबवेपर्यंत चालक अंबुजाक्षन यांनी अंबालापारा ते अनक्कयमपर्यंत रिव्हर्स गिअरमध्ये बस चालवली. 'हा अविस्मरणीय अनुभव होता. सगळे घाबरले होते. ८ किमीहून अधिक रिव्हर्स बस नेण्याशिवाय पर्याय नव्हता', असे त्यांनी सांगितले. एकेरी रस्त्यावर बस वळवणे शक्य नव्हते. रस्त्यावर अनेक ठिकाणी वळणे आहेत. त्यामुळे नेटकरी ड्रायव्हरच्या कौशल्याचे कौतुक करत आहेत.