रियाध - इस्लाममधील पवित्र महिना असलेल्या रमजानपूर्वी सौदी अरेबियामध्ये एका उंटावर विक्रमी बोली लागली आहे. लिलावात लागलेल्या या बोलीची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हा उंट सौदी अरेबियातील सर्वात महागड्या उंटांपैकी एक असल्याचे सांगण्यात येत आहे. सौदी अरेबियामध्ये या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण उंटावर एका लिलावामध्ये सात दशलक्ष सौदी रियाल म्हणजे भारतीय चलनातील १४ कोटी २३ लाख ४५ हजार ४६२ रुपये एवढी बोली लागली.
सौदी अरेबियातील स्थानिक न्यूज पोर्टल असलेल्या Al Mard ने ही माहिती दिली आहे. हा उंट सौदीतील सर्वात महागड्या उंटांपैकी एक आहे. या उंटासाठी एका सार्वजनिक लिलावाचं आयोजन केलं होतं.
आता या लिलावाचा व्हिडीओसुद्धा समोर आला आहे. त्यामध्ये बोली लावणारी व्यक्ती पारंपरिक पोशाखामध्ये गर्दीसमोर लिलावाची बोली लावत आहेत. उंटाची प्राथमिक बोली ५ दशलक्ष सौदी रियाल (१० कोटी १६ लाख ४८ हजार ८८० रुपये) पासून सुरू झाली होती.
उंटासाठी कमाल बोली ही ७ दशलक्ष सौदी रियाल एवढी निश्चित करण्यात आली. मात्र उंटासाठी एवढी महागडी किंमत देत ते कुणी खरेदी केले, हे समोर येऊ शकलेले नाही. लिलाव झालेले उंट हे खूप दुर्मीळ प्रजातीमधील आहे. तसेच ते आपली वेगळं सौंदर्य आणि वेगळेपणासाठी विख्यात आहे. त्यामुळेच त्याला एवढी किंमत दिली गेली.
वाळवंटी प्रदेशामध्ये उंटांना खूप महत्त्व दिलं जातं. तसेच ते सौदीमधील संस्कृतीचाही महत्त्वाचा भाग आहे. उंटला वाळवंटातील जहाज म्हणूनही ओळखलं जातं.