कोणाला कसली आवड असेल सांगता येत नाही. व्यक्तिपरत्वे ही आवड बदलते. कोणाला खाण्यापिण्याची आवड असते, कोणाला फॅशनेबल कपड्यांची आवड असते, कोणाला कायम तरुण दिसण्याची क्रेझ असते, तर कोणाला अंगावर टॅटू गोंदवून घेण्याची हौस असते. यात पुरुषांपासून स्त्रियांपर्यंत कोणीही मागे नाहीत. क्रिकेटपटू विराट कोहलीपासून तर तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला कॅनडियन सिंगर जस्टिन बिबरपर्यंत अनेक जण आपल्या अंगावरचे टॅटू अभिमानानं मिरवताना दिसतात. हॉलीवूड स्टार्समध्ये तर टॅटूची ही क्रेझ खूपच जोरात आहे. कोणाकोणाची नावं घ्यावीत?.. झेन मलिक, लेडी गागा, हिली बाल्डवीन, डकोटा जॉन्सन, सोफी टर्नर, एमा वॉटसन, मिली सायरस, पॅरिस जॅकसन, केली जेनर.. अशी शेकडो नावं घेता येतील. या प्रत्येकानं आपल्या अंगावर, वेगवेगळ्या अवयवांवर विविध आकार, प्रकार आणि रंगातील टॅटू गोंदवून घेतले आहेत. त्याचं ते कायम प्रदर्शनही करीत असतात. केंडल जेनर या प्रसिद्ध अमेरिकन मॉडेलनं तर आपल्या ओठांच्या आतल्या भागावरही टॅटूनं गोंदवून घेतलं आहे.
जर्मनीची एक प्रसिद्ध मॉडेल केर्स्टिन ट्रिस्टन हीदेखील टॅटूची अक्षरश: दिवानी. आपल्या सौंदर्यानं जगभरातल्या रसिकांवर तिनं मोहिनी टाकली आहे. आज तिचं वय आहे ५० वर्षे. ती आजीदेखील झालेली आहे, पण आजही ती सोशल मीडिया स्टार आणि तरुणांच्या हृदयाची धडकन आहे. आपल्या फिटनेसमुळे तिनं आपलं तारुण्य अजूनही अबाधित राखलं आहे, पण तुझ्या तारुण्याचं राज काय, असं जर केर्स्टिनला विचारलं, तर त्याचं सारं श्रेय ती आपल्या अंगावर असलेल्या टॅटूंना देते. केर्स्टिन सांगते, “माझ्या अंगावरील टॅटूंनी माझ्या सौंदर्याला चार चांद लावले आहेत. आजही माझ्यामागे तरुण पोरांची रांग असते, याचं कारण माझ्या अंगावरचे टॅटू. हे टॅटूच माझ्यावरची नजर ढळू देत नाहीत. मला त्याचा अभिमान आहे!”
या केर्स्टिन बाई का एवढ्या प्रसिद्ध आहेत? का आजही जगभरात त्यांचं नाव आहे? त्यांनी असं केलंय तरी काय? केर्स्टिन ट्रिस्टन म्हणजे खरोखरच एक नवल आहे. तिनं आपल्या अंगावर एकही जागा अशी सोडलेली नाही, जिथे तिनं टॅटू गोंदवून घेतलेले नाहीत! एवढं असूनही आपल्या शरीरावर आणखी काही टॅटू तिला गोंदवून घ्यायचेच आहेत. स्वत:च्या शरीरावर त्यासाठीची जागा ती शोधते आहे. टॅटूसाठी शरीरावर आणखी काही जागा निर्माण करता येतील का, याचाही तिचा शोध सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून तिला टॅटूचं वेड लागलं आणि मग एक एक करत गेल्या पाच वर्षांत आपलं सारं शरीरच तिनं गोंदवून टाकलं. पानं, फुलं, फुलपाखरं, वेगवेगळ्या प्रकारचं डिझाइन असलेले अक्षरश: शेकडो टॅटू तिनं आपल्या अंगावर गोंदवून घेतले आहेत. त्यासाठी आतापर्यंत लाखो रुपयेही खर्च केले आहेत. ‘डेली स्टार’च्या वृत्तानुसार केर्स्टिननं आतापर्यंत केवळ टॅटूंसाठी २५ हजार पाऊंड्स (सुमारे २४ लाख रुपये) खर्च केले आहेत. या टॅटूंचे फोटो सोशल मीडियावर ती नेमानं शेअरही करीत असते. नुसत्या या फोटोंच्या माध्यमातूनच लाखो रुपयांची कमाई ती करते. टॅटूपूर्वीचे आणि टॅटूनंतरचे तिचे हे फोटो पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांच्याही सोशल मीडियावर उड्या पडतात.
ऐन तारुण्यात असताना म्हणजे तीस वर्षांपूर्वीचे, त्याचबरोबर आठ वर्षांपूर्वीचे आणि आताचे असेही काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. १९९२, २०१४ आणि २०२२ चे तिचे हे फोटो म्हणजे तिच्या तारुण्याचा बदलता प्रवासच आहे. हे टॅटूच मला ऊर्जा देतात आणि आज वयाच्या पन्नाशीतही त्यांनीच माझं तारुण्य टिकवून ठेवलं आहे, असं केर्स्टिनचं म्हणणं आहे.
एक सेंटिमीटर जागाही मोकळी नाही!..पण का केलं केर्स्टिननं असं? आपल्या अंगावर टॅटू गोंदवून घेताना एक सेंटिमीटर जागाही तिनं मोकळी का ठेवली नाही? ते एक मोठं रहस्य आहे : केर्स्टिनला सुरुवातीपासूनच अंगभर कपडे घालण्याचा कंटाळा होता. अंग झाकणाऱ्या, वजनदार कपड्यांनी तिला अक्षरश: बोअर व्हायचं, त्यापेक्षाही या कपड्यांनी तिला अस्वस्थ व्हायचं. त्यामुळेच तीनं टॅटूंचा सोपा उपाय शोधून काढला. या आयडियामुळे अगदी टीचभर कपडे घातले तरी तिला आता चालून जातं. कारण हे टॅटूच आता तिचे कपडे झाले आहेत.