प्रेमात खूप ताकद असते, जर एखादा चुकीच्या वाटेने जात असेल तर प्रेमामुळे त्याला योग्य रस्त्यावर पुन्हा आणता येते. झारखंडमध्ये हे एका प्रेयसीनं सिद्ध करून दाखवलं आहे. वाईट मार्गावर असलेल्या प्रियकराला प्रेयसीनं चांगल्या मार्गावर आणलं आहे. झारखंडच्या सरायकेला जिल्ह्यातील ही घटना आहे. याठिकाणी भाकपा नक्षलवादी संघटनेचा कट्टर नक्षली महाराज प्रमाणिक याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
महाराज प्रमाणिक याची शरणागती पत्करण्यामागे मुख्य कारण म्हणजे त्याची प्रेयसी आहे. महाराज प्रमाणिक नक्षलवादी म्हणून आयुष्य जगावं असं प्रेयसीला अजिबात वाटत नव्हतं. प्रियकर हा मार्ग सोडून पुन्हा मुख्य प्रवाहात यावा. जेलमधून शिक्षा भोगल्यानंतर सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगावं असं प्रेयसीला वाटत होतं. प्रियकरासोबत सुखी आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्या प्रेयसीने महाराजनं चांगलं जीवन जगावं यासाठी प्रयत्न केले. तिने त्याला खूप समजावलं. मात्र तरी तो संघटना सोडण्याच्या तयारीत नव्हता. त्यानंतर महाराज प्रमाणिकच्या प्रेयसीनं प्रियकराला चांगल्या वळणावर आणण्यासाठी एक मार्ग अवलंबला.
प्रेयसीनं भेटणं सोडलं
नक्षलवादी संघटनेकडून काढल्यानंतर महाराज प्रमाणिक स्वत:ची संघटना तयार करण्याच्या प्रयत्नात होता. त्यानंतर त्याने परिसरात खंडणी वसूल करण्याचं काम केले. त्याच्या प्रेयसीनेही हट्ट सोडला नाही. जोपर्यंत महाराज प्रमाणिक पोलिसांना आत्मसमर्पण करणार नाही तोवर त्याला न भेटण्याचा निश्चिय प्रेयसीनं केला. प्रियकराला भेटणं प्रेयसीनं सोडलं. त्यानंतर एकेदिवशी प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी पोहचला. तेव्हा प्रेयसीने त्याला सरेंडर होण्याची मागणी केली. त्यानंतर महाराजने सरेंडर झाल्यानंतरच तुला भेटेन असं वचन प्रेयसीला दिलं.
प्रेयसीचं म्हणणं प्रियकरानं ऐकलं
प्रेयसीच्या प्रेमासाठी त्याने नवीन संघटना काढण्याचं खुळ डोक्यातून काढून टाकलं. त्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधला आणि आत्मसमर्पण केले. पोलिसांशी संवाद साधल्यानंतर त्याने या सगळ्या गोष्टीचा खुलासा केला. मागील काही वर्षापासून महाराज एका मुलीवर जीवापाड प्रेम करतात. तिनेच नक्षली मार्ग सोडून महाराज प्रमाणिकला सरेंडर करण्यासाठी प्रोत्साहित केले असं पोलिसांनी सांगितले.
सरेंडरची अधिकृत घोषणा बाकी
महाराज प्रमाणिक सरायकेला-खरसावा जिल्ह्यातील इचागड परिसरात राहतो. त्याच्या वडिलांचे नाव जरासिंधु प्रमाणिक आहे. महाराज नक्षलवादी संघटनेत जोनल कमांडर होता. त्याच्यावर १० लाखाचे इनाम होते. २४ ऑगस्टला पोलिसांसमोर त्याने आत्मसमर्पण केले. सरेंडर होण्यापूर्वी तो पोलिसांना मिळाल्याच्या आरोपावरुन त्याला संघटनेतून काढून टाकलं होतं. आतापर्यंत पोलिसांनी दोन नक्षलींच्या आत्मसमर्पणाची अधिकृत घोषणा केली नाही.