नवी दिल्ली - काळानुसार सर्वच जण बदलतात आणि तो बदल गरजेचा देखील असतो. सध्याचा जमाना हा ऑनलाईनचा आहे. डिजिटल माध्यमांच्या मदतीने अनेक कामं ही अगदी सोपी आणि सहज झाली आहेत. पण तुम्हाला जर कोणी आता भिकारी देखील डिजिटल फ्रेंडली झाल्याचं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो, हे खरं आहे. एका भिकाऱ्याने भीक मागून मागून पैसे जमवले. त्याच पैशांतून त्याने लाखोंची प्रॉपर्टी घेतली आणि आता तो हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या तयारीत असल्याची घटना समोर आली आहे.
मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील सुरखी येथील हा झुनझुन बाबा याची सध्या जोरदार चर्चा रंगली असून व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहे. झुनझुन बाबा पेटीएममार्फत भीक मागतो. अशीच भीक मागून त्याने लाखोंची प्रॉपर्टी घेतली आहे आणि आता हेलिकॉप्टर खरेदी करण्याचं स्वप्न आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलाच्या फोनमध्ये पेटीएम आहे. त्याला हे पैसे जातात आणि जेव्हा झुनझुन बाबाला गरज असते तेव्हा तो त्याला हवे तेवढे पैसे देतो.
झुनझुन बाबाने भीक मागून तब्बल 40-50 लाख रुपये जमवले आहेत. इंदौर आणि सागरमध्ये त्याची प्रॉपर्टी आहे. आता फक्त त्याला हेलिकॉप्टर खरेदी करायचं आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो पैसे जमवत आहे. लोकांकडे भीक मागितल्यावर जर कोणी त्याला पैसे नाहीत असं सांगितलं तर तो लगेचच पेटीएम करण्याचा सल्ला देतो. तसेच त्याच्या हातात एक भांडं देखील आहे. काही लोक त्यामध्ये पैसे टाकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.