ऑनलाइन लोकमत
हैद्राबाद, दि. 1- जगातील प्रत्येक व्यक्ती श्रद्धेने मंदिरात जात असतो. जात,धर्म,पंत याचा विचार न करता सगळे भक्ती-भावाने देवाची पूजा करताना पाहायला मिळतात. तसंच मंदिरात जाण्यापासून रोखण्यासाठी कोणतेही नियम नसतात. पण तेलंगणाच्या श्री सीता रामचंद्र स्वामी मंदिरात मंदिर प्रशासनाकडून एक नवा नियम लागू करण्यात आला आहे. मंदिरात जाताना फक्त पारंपारिक कपडे परिधान करावे, असा नवा नियम सुरू करण्यात आला आहे. आजपासून या नियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मंदिरात जीन्स, टी-शर्ट तसंच स्कर्ट घालून प्रवेश करण्यावर बंदी टाकण्यात आली आहे.
आंध्रप्रदेशमधील तिरूमाला तिरूपती देवस्थानामध्ये तिरूमाला आणि तिरूपती मंदिर, वेंकटेश्वर स्वामी मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी ड्रेसकोड निश्चित करण्यात आला आहे. पुरूषांसाठी धोतर-कुर्ता, लुंगी-सदरा असा ड्रेसकोड ठरवण्यात आला आहे. तर महिलांना साडी किंवा सलवार-कुर्ता असा ड्रेसकोड ठरविण्यात आला आहे.
हिंदू मंदिरात पारंपारिक वातावरण जपण्यासाठी तसंच हिंदू धर्माची मूल्यं जपण्यासाठी मंदिर प्रशासनाने भाविकांना जीन्स-टी-शर्ट सारखे कपडे परिधान करून मंदिरात यायला मनाई केली असल्याचं, श्री सीता रामचंद्र स्वामी मंदिराचे कार्यकारी अधिकारी के. प्रभाकर श्रीनिवास यांचं म्हणणं आहे.
मंदिर प्रशासनाकडून निश्चित करण्यात आलेला ड्रेसकोड परिधान करून जर भाविक आले नाहीत तर त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नाही. तसंच मंदिरातील महत्त्वाच्या पूजेतही सहभाग घेता येणार नाही. लहान मुलांसाठी हा नियम लागू नसेल. दहा वर्षापर्यतची मुलं वेस्टर्न कपडे घालून मंदिरात येऊ शकतात पण त्यांनासुद्धा घट्ट जीन्स-टीशर्ट वापरता येणार नाही.
आपल्या घरी जेव्हा पूजा असते किंवा सण-समारंभ असतात तेव्हा आपण आवडीने पारंपारिक कपडे वापरत असतो. तोच नियम आता मंदिरात येताना भाविकांनी पाळयचा आहे, असं मत प्रभाकर श्रीनिवास यांनी व्यक्त केलं आहे.
.