जगण्यासाठी खाण्यापेक्षा खाण्यासाठी जगणारे काही खवय्ये जगात असतात. अॅडम मॉरेन या तेहतिशीच्या पठ्ठ्याने न्याहारीच्या वेळी महाथाळीतील तब्बल पासष्ट पदार्थ फस्त केले. ४ हजार कॅलरीज असलेला आहार केवळ १२ मिनिटांत संपवून तृप्तीचा ढेकर दिलाच, एक उच्चांकही नावावर जोडला. अॅडम मॉरेन हा यूट्युबवरील प्रसिद्ध माणूस. इंग्लंडमध्येच तो जन्मला आणि वाढला. खाद्यपदार्थांच्या अधिकाधिक सेवन करण्याच्या ज्या स्पर्धा असतात, त्यात तो हिरिरीने भाग घेतो. ‘बिअर्ड मिट्स फूड’ हा त्याचा कार्यक्रम प्रसिद्ध आहे. तो व्यवसायाने बँकर आहे. मात्र, यूट्युबर म्हणून त्याला ओळख मिळाली. स्वत:च्या खादाडीच्या उच्चांकांचे चित्रण तो करतो आणि प्रसारित करतो. त्याने नुकत्याच केलेल्या उदरभरण विक्रमाचे यूट्युबवरून प्रसारण केले. त्याला एकूण तीन लाख ‘व्ह्यू’ मिळाले. आणखीही मिळत आहेत. लंडनमधील नॉटिंगहॅमशायर येथे शेफर्ड प्लेसमध्ये ‘टर्मिनेटर टू’ नामक कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. चविष्ट, रंगतदार अनेक पदार्थांच्या महाथाळीसाठी ‘टर्मिनेटर टू’ ही गमतीशीर संज्ञा असावी. अन्न पदार्थांची चव घेण्यासाठीचा हा रसिक इंग्लंडवासीयांचा आवडता कार्यक्रम आहे. मॉरेन काही कामानिमित्त शेफर्ड प्लेस येथे आला होता. त्याने या हॉटेलमध्ये थांबून आव्हान स्वीकारण्याचे ठरविले. अजब विक्रमाबद्दल प्रसारित झालेल्या व्हिडीओमध्ये ६५ पदार्थांवर ताव मारताना तो दिसतो. अगदी कमी वेळेत प्लेटमधील पदार्थ संपविताना त्याला पाहून अचंबा वाटतो. हे आव्हान स्वीकारताना अॅडम चाहत्यांशी आॅनलाइन गप्पाही करताना दिसतो. पदार्थांची तारीफ करतो. मनमुराद दाद देत ते खूप उत्तम असल्याचे सांगतो. बेकन, सॉसेजेस, अंडी, टोस्ट, बेक्ड बीन्स, मश्रूम्स, कॉफी, टोमॅटोचे काप अशा नाना पदार्थांना तो उदरात आश्रय देतो. असे असले तरी अॅडम हा महाथाळी संपविणारा एकमेव नाही. तीन जणांनी यापूर्वी अशी भरपूर पदार्थ फस्त करण्याची कमाल केली आहे. मात्र, अॅडम याने जो वेळ घेतला, तो त्यांच्यापेक्षा खूपच कमी आहे.
पासष्ट पदार्थ केले १२ मिनिटांत फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 4:05 AM