सोशल मीडिया हे केवळ मनोरंजन आणि लोकप्रियतेचे साधन नाही, तर आज या माध्यमाने अनेकांचे आयुष्य बदलून टाकले आहे. अनेकांसाठी सोशल मीडिया हे एक पैसे कमावण्याचे नवे साधन बनले आहे. अनेक लोक YouTube, Instagram, Twitter आणि Tik Tok च्या माध्यमाने लाखो, करोडो रुपये कमावत आहेत. कंटेंट क्रिएटर्स अद्वितीय व्हिडिओ तयार करून लोकांचे लक्ष आकर्षित करण्यात यशस्वी होत आहेत. याच प्रकारे, स्कॉटलंडमधील एका महिलेने नोकरी सोडली आणि ती आता कंटेंट क्रिएटर बनली आहे. महत्वाचे म्हणजे, सोशल मीडियाद्वारे कमाई करून ही महिला ऐशोआरामाचे जीवन जगत आहे.
स्कॉटिश महिला जिया ओ'शॉघनेसी (Zia O'Shaughnessy) केवळ केस धुण्यासंदर्भातील व्हिडिओ तयार करून पैसे कमवत आहे. इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर तिचे प्रचंड फॉलोअर्स आहेत. जियाने 2021 मध्ये TikTok वर केस धुण्याच्या टेक्निक संदर्भातील एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ बघता बघता प्रचंड व्हायरल झाला. सुमारे साडेतीन कोटी लोकांनी तो व्हिडिओ बघितला. हा रिस्पॉन्स पाहून जियाने तिची नोकरी सोडली आणि कंटेंट क्रिएटर म्हणून ती पूर्णवेळ काम करू लागली.
द सनने दिलेल्या वृत्तानुसार, कधीकाळी जियावर 8 लाखांचे कर्ज होते. मात्र, आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की, या क्षेत्रात पाय ठेवल्यानंतर, जियाची कमाई एवढी वाढली की, तिने केवळ तिच्या वरील कर्जच चुकवले नाही, तर वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षीच स्वतःचे घरही विकत घेतले. त्या घराची किंमत अंदाजे 1.8 कोटी रुपये एवढी आहे.
टिक टॉकवरील लोकप्रियतेनंतर, जियाची संपत्तीही प्रचंड वाढली आहे. ती एका व्हिडिओतून जवळपास 4 लाख रुपये कमावते. जिला व्हिडिओ तयार करण्यासाठी एक तास लागतो. दोन मुलांची आई असलेली जिया घरात राहून आणि चांगल्या प्रकारे कमाई करून अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे.