लग्न ही कोणत्याही मुला-मुलीच्या जीवनातील सर्वात मोठी गोष्ट असते. कारण लग्नानंतर त्यांचं संपूर्ण जीवन बदलणार असतं. यात मुलीच्या आयुष्यात सर्वात जास्त बदल होतात. लग्न म्हटलं की, मुला-मुलीमध्ये सर्वात जास्त उत्सुकता असते ती, पहिल्या रात्रीची. जगभरात पहिल्या रात्रीच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. अशीच एक प्रथा बंगाली लोकांमध्ये असते. ही प्रथा फारच वेगळी आहे. पहिल्या रात्रीला इथे काळरात्र म्हटली जाते. म्हणजे ही रात्र अशुभ मानली जाते.
बंगाली प्रथेनुसार या लग्नानंतरच्या पहिल्या रात्री जोडप्याला एकत्र राहता येत नाही. त्यांना वेगवेगळं रहावं लागतं. याचं काय कारण असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर याबाबत एक दंतकथा सांगितली जाते. त्या कथेनुसार ही रात्र काळरात्र मानली जाते.
अशी मान्यता आहे की, भगवान शंकराची मुलगी मनसा ही सर्प देवता होती. पण तिची देवांसारखी पूजा केली जात नव्हती. त्यासाठी ती अनेक प्रयत्न करायची. पण तिला फारसं यश आलं नाही. तिने चांग सौदागर नावाच्या श्रीमंत व्यापाऱ्याला सांगितलं की, माझी देवता म्हणून पूजा कर. पण त्याने नकार दिला. मनसाने त्याला श्राप दिला. याने त्याच्या जहाजे समुद्रात बुडाली आणि सहा मुलांचा मृत्यू देखील झाला.
पण तरीही त्याने काही मनसाची पूजा करणं मान्य केलं नाही. त्यानंतर चांद सौदागरच्या लहान मुलाचं लग्न होतं. मनसाने श्राप दिला होता की, जेव्हा नवविवाहित जोडपं सोबत पहिली रात्र घालवेल तेव्हा नवरदेवाचा सर्प दंशाने मृत्यू होईल. झालंही तसंच. चांद सौदागरच्या लहान मुलाचा पहिल्या रात्रीच मृत्यू झला.
पण चांद सौदागरचा लहान मुलगा लखिंदरची पत्नी बेहुलाला तिचा पती परत हवा होता. अनेक प्रयत्नांनंतर बेहुला मनसाला भेटू शकली. बेहुलाची स्थिती पाहून मनसाची सावत्र आई पार्वतीने मनसाला आदेश दिला की, बेहुलाच्या पतीला जीवनदान दे.
(Image Credit ; indiagramnews.com)
मनसाने हा आदेश स्वीकारला. पण एक अट बेहुला समोर ठेवली. ती अट होती की, चांद सौदागरने मनसाचा स्वीकार देवी म्हणून करावा आणि तिची पूजा करावी. गमावलेली सगळी संपत्ती, मुलं परत मिळणार हे पाहून चांद सौदागरने मनसाचा देवी म्हणून स्वीकार केला. नंतर सगळे आनंदाने राहू लागले. तेव्हापासूनच लग्नाची पहिली रात्र काळरात्र म्हणून पाळली जाते. त्यामुळे आजही नवविवाहित जोडपं पहिल्या रात्री वेगळं राहतं.