कानपूर: दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट वापरा, अशी सूचना तुम्ही अनेकदा ऐकली असेल. दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्यानं वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्याच्या घटनादेखील तुम्ही पाहिल्या असतील. मात्र कानपूरमध्ये एक अजब घटना घडली आहे. कार चालकानं हेल्मेट न घातल्यानं पोलिसांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. पोलिसांनी कार चालकाला १ हजारांचा दंड ठोठावला. याचा निषेध म्हणून आता कार चालक हेल्मेट घालून कार चालवू लागला आहे. या चालकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी याबद्दल काही बोलण्यास नकार दिला आहे.पाण्याचे नळ सुरू करताच ४० घरांमध्ये यायची देशी दारू; तक्रारीनंतर उघडकीस आला भलताच प्रकार
नौबस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विशाल मिश्र यांच्याकडे मारुती सुझुकीची स्विफ्ट कार आहे. ३१ ऑगस्टला ते काही काही कामासाठी शहरात गेले होते. तिथून ते घरी आले, तेव्हा त्यांच्या मोबाईलवर ऑनलाईन चलानचा मेसेज आला होता. हेल्मेट न घालता कार चालवल्यानं १ हजार रुपये दंड भरण्याचा मेसेज मिश्र यांना आला होता. त्यानंतर मिश्र हेल्मेट घालून कार चालवू लागले आहेत. पोलिसांनी दुसऱ्यांदा दंडात्मक कारवाई करू नये यासाठी मिश्र हेल्मेट परिधान करून कार चालवतात.
हेल्मेट घालून कार चालवणारे विशाल मिश्र सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहेत. ते जिथे जातात, तिथे लक्षवेधी ठरतात. तर दुसरीकडे वाहतूक पोलिसांच्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावर भाष्य करण्यास पोलीस तयार होत नाहीत. या प्रकरणाचा तपास करण्यात येईल, असं त्रोटक उत्तर त्यांच्याकडून दिलं जात आहे.