मुंबई- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (ता. 15 मे) रोजी जाहीर झाला. निकालानंतर कर्नाटकची विधानसभा त्रिशंकू स्थितीत असल्यानं आमदारांच्या फोडाफोडीला वेग आल्याचं चित्र दिसतं आहे. अशातच सोशल मीडियावर विविध चर्चांना तसंच मेम्सला उधाण आलं आहे. काँग्रेस, भाजपा व जेडीएसवर विविध मेम्स करुन सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.
कशा प्रकारे काँग्रेस, भाजपा जेडीएसकडून कर्नाटकात सत्ता स्थापनेचे प्रयत्न केले जात आहेत हे मेम्सच्या माध्यमातून विनोदीपणे सांगण्याचा प्रयत्न नेटीझन्सकडून केला जातो आहे. या सगळ्या मेम्समध्ये एक मेम असं आहे जे सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधतं आहे. यामध्ये चक्क फ्लिपकार्ट व अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवर आमदारांची मागणी होताना दिसते आहे.
एक व्यक्ती अॅमेझॉन हेल्पकडे ट्विटरवर मदत मागताना दिसते आहे. त्यावर अॅमेझॉन उत्तर देते. अॅमेझॉनच्या उत्तरावर ही व्यक्ती जेडीएसचे 7 आमदार मिळतील का? अशी मागणी करते. जेडीएसचे सात आमदार घेऊन ते अमित शहांना भेट द्यायचे आहेत, अशा स्वरूपाची मागणी करणारं मेम तयार करण्यात आलं आहे.
दुसरं मेम फ्लिपकार्ट संदर्भातील आहे. एक जण फ्लिपकार्टला ट्विटरवर टॅग करत मदतीची मागणी करत. फ्लिपकार्टकडून उत्तर आल्यावर 10 जेडीएस किंवा काँग्रेसचे आमदार मिळतील का? काय चांगलं डील देऊ शकता? अशी मागणी मेममधून होते आहे.मंगळवारी कर्नाटक विधानसभेची मतमोजणी सुरू झाल्यापासूनच सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं होतं. तसंच मेम्सही तयार करण्यात येत होते. मतमोजणीपासून ते निकाल येईपर्यंत सोशल मीडियावर मेम्सचा अक्षरशः पूर आला होता.