तुम्ही एका नारळाचे किती पैसे द्याल? २५ रुपये? ३५ रुपये? जास्तीत जास्त ४० रुपये. पण एका फळ विक्रेत्याने एक नारळ तब्बल ६ लाख ५ हजाराला खरेदी केला. कर्नाटकातील ही घटना असून एका मंदिरातील नारळाच्या लिलावादरम्यान त्यानं हा नारळ खरेदी केला आहे. हे मंदीर बगलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथील चिक्कालकी गावात आहे. नारळ विकत घेणारा व्यक्ती विजयपुरा जिल्ह्यातील टिक्कोटा गावातील फळविक्रेता आहे.
श्री बीलिंगेश्वल यात्रेत श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी मंदीर समितीनं नारळाचा लिलाव केला. यात अनेकांनी भाग घेतला. मात्र, कोणीही फळ विक्रेत्यानं लावली त्या बोलीच्या आसपासही गेलं नाही. भगवान मलिंगराय म्हणजे शिवाच्या नंदीचं रूप मानलं जातं. त्यामुळे,या देवाजवळ ठेवलेला नारळ त्यांच्या भक्तांसाठी सर्वात खास असतो. हा नारळ खरेदी करण्याचं भाग्य फळफळत असा समज आहे.
मंदीर समिती बऱ्याच काळापासून या नारळाचा लिलाव करते. मात्र, यासाठी कधीही १० हजाराहून अधिकची बोली लागली नाही. मात्र, यंदा बोली एक गजार रुपयांपासून सुरू झाली,.हा आकडा १ लाखाच्या पार गेला. यानंतर एका भक्तानं तीन लाखाची बोली लावली. मंदीर समितीच्या सदस्यांनी लगेचच ही अंतिम बोली ठरवत लिलाव संपवण्याचा निर्णय घेतला, कारण नारळासाठी याआधी कधीही इतकी बोली लागली नव्हती. मात्र, अखेर फळविक्रेत्यानं दुप्पट रक्कम देत हा नारळ ६.५ लाखाला खरेदी केला.
मिळालेल्या या रकमेचा वापर मंदिराच्या विकासासाठी आणि इतर धार्मिक कामासांसाठी केला जाणार असल्याचं मंदीर समितीनं सांगितलं. बोली लावलेल्या महावीर या फळविक्रेत्यानं म्हटलं, की भलेही लोक मला वेडा म्हणो किंवा याला अंधश्रद्धा म्हणो. मात्र, माझ्यासाठी ही भक्ती आणि विश्वास होता. त्यांनी सांगितलं, की जेव्हा ते आर्थिक आणि आरोग्यविषयक अडचणींचा सामना करत होते, तेव्हा त्यांनी देवाकडे प्रार्थना केली होती आणि काही महिन्यांतच सगळं काही बदललं. महावीर यांनी सांगितलं, की हा नारळ ते आपल्या घरी ठेवणार आहेत आणि रोज याची पुजाही करणार आहेत.